कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा इतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व महत्त्वाचे – राज्यपाल रमेश बैस

0
9

मुंबई, दि. १८ : कॉर्पोरेट उद्योग समूहांच्या वतीने सामाजिक दायित्व निधीतून विविध सामाजिक कार्यांना मदत केली जाते. परंतु कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा इतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व महत्त्वाचे असून लोकांनी चांगल्या कार्यासाठी स्वतः देखील योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-२० परिषदेअंतर्गत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या समाज कार्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित ‘सी-२० चौपाल’ या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ‘सी-२० चौपाल’ कार्यशाळेचे आयोजन सेवा इंटरनॅशनल व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या वतीने वेलिंगकर स्कूल येथे करण्यात आले होते.

यावेळी राज्याचे कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सेवा सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल नागरस, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. सदानंद फडके, सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या विश्वस्त डॉ. अलका मांडके, सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे तसेच विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एखाद्या व्यक्तीकडे करोडो रुपयांची संपत्ती असताना त्याने त्या संपत्तीतून काही लाख रुपये समाजकार्यासाठी दान करणे निश्चितच महत्वाचे आहे. परंतु स्वतः कडे एक चपाती असताना त्यातील अर्धी चपाती गरजू व्यक्तीला देणे अधिक महत्वाचे आहे, असे सांगताना राज्यपालांनी विकास कार्यामध्ये राजकारण आणले जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

केंद्र व राज्य शासनाच्या ग्राम विकासासाठी अनेक योजना आहेत. परंतु त्यांची माहिती ग्रामीण जनतेकडे नसल्यामुळे त्या योजनांचा पुरेसा लाभ संबंधित लोकांना होत नाही. यासाठी सामाजिक संस्थांनी विकास योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून गावांची तसेच गावातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, असे राज्यपालांनी सांगितले.

एकेकाळी जर्मनी, त्यानंतर जपान आणि कालांतराने चीनची उत्पादने जगभर विकल्या जाऊ लागली. एकविसावे शतक भारताचे व्हावे या दृष्टीने सर्वांनी देशभक्तीच्या भावनेने कार्य केल्यास भारत निश्चितपणे जगात आपले स्थान निर्माण करेल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी आपल्या वैयक्तिक मिळकतीतून समाज कार्यासाठी ३ कोटी रुपयांचे योगदान देणाऱ्या श्रीमती अनुश्री भिडे  व आनंद भिडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here