सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यामुळे कृष्णा नदीतील होत असलेल्या प्रदूषणाबाबत कार्यवाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 20 : सांगली जिल्ह्यातील सांगली – कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णा नदीवरील अंकलीपूल येथे कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भात विधानसभा सदस्य जयंत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मे.स्वप्नपूर्ती शुगर लि. आसवनी विभाग- मे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.) या कारखान्याच्या स्पेंटवॉशयुक्त सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मे.श्री दत्त इंडिया प्रा. लि.(साखर विभाग मे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.) सांगली या साखर कारखान्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारखाना बंद करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण यंत्रणामार्फत करण्यात आलेल्या पाहणीत सांगली शहरातून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता शेरीनाल्याद्वारे कृष्णा नदी पात्रामध्ये तसेच काही प्रमाणात सांडपाणी उपसा पंपाद्वारे सांगली बंदराच्या खालील बाजू सोडले जात असल्याचे निदर्शनास आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सांगली मिरज- कुपवाड शहर महानगरपालिकेस नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या भागात आरोग्याच्या दृष्टीनेही जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या वतीने पाहणी केली असता जलजन्य आजाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत.
सांगली महानगरपालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 62 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
०००
मैंदर्गी नगरपालिकेत मिळकत पत्रिका दुरुस्तीसाठी विशेष मोहीम घेणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 20 : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील नगर भूमापनाचे काम व मिळकतीचे मालकी हक्क घोषित होण्याची कार्यवाही होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यामुळे आता पूर्वी झालेले सिटी सर्व्हे रद्द करून फेरसिटी सर्व्हे करणे योग्य होणार नाही. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्या स्तरावरून मैंदर्गी शहरातील तपासणी करावयाच्या उर्वरित 1908 मिळकतधारकांचे मिळकतीसंबंधी विशेष मोहीम घेण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य सचिन कल्याण शेट्टी यांनी मैंदर्गी नगरपालिका सिटी सर्व्हेमध्ये झालेल्या त्रुटींसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, फेरसिटी सर्व्हेमध्ये बराच कालावधी जाईल. आक्षेप असलेल्या नागरिकांच्या त्रुटी दूर करण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विशेष कार्यक्रम घेण्यात येईल.
००००
रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्यांकडून थकीत कर वसुलीबाबत कारवाई करणार – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 20 : पनवेल तालुक्यातील अमेटी युनिव्हर्सिटी भाताण तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्याकडून ग्रामपंचायतीच्या थकीत कराची वसुली कमी झाली आहे. कर थकविणाऱ्या कंपन्या तसेच अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य महेश बालदी यांनी पनवेल तालुक्यातील रसायनी पातळगंगा औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या तसेच अमेटी युनिव्हर्सिटी भाताण यांच्यामार्फत मालमत्ता कर ग्रामपंचायतीला दिला नसल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, अमेटी युनिव्हर्सिटी यांच्याकडील करपात्र इमारतीवरील कर वसुलीसाठी ग्रामपंचायत भाताण यांनी कर वसुलीची कार्यवाही सुरू केली आहे. कर वसुली कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे किंवा नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अडचणी आलेल्या नाहीत. जास्तीत जास्त कर वसुली करण्याबाबत ग्रामपंचायत व औद्योगिक विकास महामंडळाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य दिलीप वळसे पाटील, प्रशांत ठाकूर, ॲड.यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.
००००
जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 20 : बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य नमिता मुंदडा यांनी बीड जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांमध्ये झालेल्या तक्रारीबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार उपायुक्त विकास यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठित करून विभागीय आयुक्तालयामार्फत चौकशी करण्यात आलेली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संदीप क्षीरसागर, लक्ष्मण पवार, धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला.
००००
छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाळूज’ प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज प्रकल्पाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे, इतर बाबी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्याची शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य शांताराम मोरे यांनी वाळूज प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, वाळूज महानगर प्रकल्पाच्या मंजूर धोरणानुसार जमीन मालकाचा प्रत्यक्ष प्रकल्पात सहभाग या संकल्पनेवर प्रत्येक महानगरातील विकास केंद्राकरिता 100% भूसंपादन प्रस्तावित आहे. विकास केंद्राबाहेर २५ टक्के संपादन करावयाचे असून उर्वरित 75 टक्के क्षेत्राचा विकास जमीन मालकाने करावयाचा आहे. भूधारकांकडील 75 टक्के जमिनीवरील विकास करण्यास सिडकोकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, सीमा हिरे यांनी सहभाग घेतला.
००००
हिंगणघाटातील ‘वना’ नदीवर बंधारा बांधकामास मंजुरी देणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वना नदीवरील बंधारा बांधकामास मंजुरी देण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य समीर कुणावार यांनी हिंगणघाट येथे नवीन बंधारा बांधकामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, केंद्र पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत हिंगणघाट शहराच्या 61.80 कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात 15 द. ल. लि. क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व वितरण व्यवस्था आणि इतर कामांचा समावेश असून सद्यस्थितीत पाणीपुरवठा प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. हिंगणघाट येथे बंधारा बांधण्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेकडून शासनास सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव सादर येईल आणि त्यानंतर मंजुरी देण्यात येईल.
००००
धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाइल पार्क’ उभारणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाईल पार्क’ उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत समिती गठित करण्यात येईल. या समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून के.पी.एम.जी. या संस्थेमार्फत प्राथमिक व्यवहार्यतेबाबत पडताळणी करून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.
००००
शैलजा पाटील/विसंअ/