लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

दि 21:- लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजनवरळी येथील नेहरू सेंटर येथे करण्यात आले.यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा,आशू दर्डा, योगेश लखानी, युवराज ढमाले, सुजाता बजाज, अमृता फडणवीस,गौर गोपालदास हे उपस्थित होते.

यावेळी अभिलिप्सा पांडा व षडज गोडखिंडी यांना उदयोन्मुख प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पद्मविभूषण पं हरिप्रसाद चौरसिया यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार -‘लिजेंड’ने सन्मानित करण्यात आले.पद्मश्री शंकर महादेवन यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार -‘आयकॉन’ने सन्मानित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमत वृत्तपत्र परिवार विविध क्षेत्रात कार्यरत असून समाजाला जोडण्याचे काम करत आहे. ज्योत्स्नाताई सुरांच्या निस्सीम उपासक होत्या.

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार देशपातळीवरील मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. अनेक नवोदित कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीने तर संपूर्ण जगाला संमोहित केले आहे. हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी षडज गोडखिंडी यांचे बासरीवादन झाले.त्यांनी राग जोग सादर केला. त्यांना तबला साथ ओजस अढिया यांनी केली.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार यांचे सतारवादन झाले.

लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडीटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.