मुंबई, दि. 23 : न्यूज 18 लोकमत वृत्त वहिनीच्यावतीने विविध क्षेत्रातील नामवंताना महाराष्ट्र गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ व अध्यात्मिक गुरू तथा जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामन पै यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सोहळ्याला व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, टिव्ही 18 चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौल उपस्थित होते.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सुपरस्टार आहेत. त्याप्रमाणेच मराठी चित्रपटांचे अशोक सराफ सुपरस्टार आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिका अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या कार्याचा हा सत्कार आहे. त्यांचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे. प्रल्हाद पै यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांनी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. समाजात अनेक व्यक्तिमत्व समाजाच्या कल्याणासाठी झटत असतात. मात्र त्यांचे कार्य समाजासमोर येत नाही.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या माध्यमातून अशी रत्ने शोधून समोर आणली. अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे महत्त्वाचे कार्य केले.
विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला व्यासपीठावर सहभागी होता आले. हे माझे भाग्य समजतो. पुरस्कार प्राप्त सर्वांचे कार्य प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते न्यूज १८ लोकमत वृत्त वहिनीच्या महाराष्ट्र गौरव विशेष पुरस्कार गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, आशिष पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओक व्यासपीठावर उपस्थित होते.
००००
निलेश तायडे/ससं/