मुंबई, दि. 24 :- महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदकधारकांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते.
राष्ट्रपती सचिवालयाच्या आदेशाप्रमाणे मुंबई उपनगर येथील एअर कमोडोर देवेंद्र पुरुषोत्तम हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शौर्यासाठी युद्ध सेवापदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे श्री.हिराणी यांना 24 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्री.हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2015 विशिष्ट सेवापदक प्रदान करण्यात आले होते. त्याकरिता श्री.हिराणी यांना रूपये 34 हजार अनुदान देण्यात येणार आहे.
मुंबई उपनगर येथील मेजर अनुज वीर सिंह यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यासाठी सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार श्री.सिंह यांना 12 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली येथील मेजर अक्षय प्रकाशराव पोतराजे यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार श्री.पोतराजे यांना 6 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त तिन्ही पदक धारकांच्या अनुसाठीची 50 टक्के रक्कम शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयीकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयाद्वारे कळविले आहे.
000
संजय ओरके/विसंअ