विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
4

सिंधुनगर संयुक्त झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण संस्थेच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : सिंधुनगर संयुक्त झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण संस्था नियोजित प्रकल्पाचा कालबद्ध कार्यक्रम  ठरविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण योजनेतंर्गत ए.डी.मार्ग, रामटेकडी पथ शिवडी येथील सिंधुनगर संयुक्त झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण संस्था नियोजित प्रकल्पाबाबत विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण योजनेतंर्गत ए.डी.मार्ग रामटेकडी पथ शिवडी येथील सिंधुनगर संयुक्त झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण संस्थेचे कामकाज नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गृहनिर्माण संस्थेतील ८१४ कुटूंबाचे दरमहा भाड्यापोटी २४ कोटी रुपये रहिवाश्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. या गृहनिर्माण संस्थेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम दिल्यानंतरच संबधित विकासकाला पुढील मंजुरी देण्यात येतील. विकासकांची आर्थिक क्षमता तपासणे तसेच लोकांना अडचणी येवू नयेत, यासाठी एक धोरण ठरविण्यात येईल. कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी परिशिष्ट दोन तयार करून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे कोणतीही अनधिकृत नावे घुसवली जाणार नाहीत अथवा रद्द करणे ही बाबच होणार नाही. त्याचबरोबर आधारकार्ड पडताळणी मोहीम देखील राबवली जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, प्रसाद लाड, सचिन अहीर, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

******

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सदस्य भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येणार आहे जेणेकरून लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करता येईल. मिसिंग लिंक देखील पूर्ण होणार आहे. तसेच आताही लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. तसेच मोटार वाहनांचा दंड वसुली करण्यासाठीही सर्व वाहनचालकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांकाची माहिती करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री भाई जगताप, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या संदर्भात लवकरच धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या (ॲश) संदर्भात लवकरच धोरण तयार करण्यात येत आहे. तसेच वाहनातून होणाऱ्या कोळसा चोरीला आळा बसवण्यासाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य उमा खापरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, औष्णिक विद्युत प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राखेच्या अनुषंगाने आपण धोरण तयार करीत आहोत. तसेच या राख वाहतुकीच्या अनुषंगाने निविदा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित वाहनांवर सीसीटीव्ही, व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम असणे आवश्यक असणार आहे. तसेच ही राख स्थानिकांना व्यवसायासाठी सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिथे जिथे ॲशबंड्स तयार झाले आहेत, त्याठिकाणी निश्चित कालावधीत ऑडीट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

यावेळी सदस्य एकनाथ खडसे, अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.

0000

मेळघाटातील अतिदुर्गम गावात पारंपरिक वीज उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : मेळघाटातील अतिदुर्गम 28 गावांतील नागरिकांना सध्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोताद्वारे वीज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांना पारंपरिक पद्धतीने शाश्वत स्वरुपात वीज निश्चितपणे देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील 28 गावांत महाऊर्जामार्फत अपारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यात आले आहे.  तसेच महावितरणद्वारे 24 गावांना पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर कऱण्यात आला आहे. त्यातील दोन गावांना वन विभागाची परवानगी मिळाली आहे. उर्वरित 22 गावे वन्यजीव विभागात येत असल्यामुळे त्यांचे वन्यजीव संवर्धन आणि वनसंवर्धन कायद्याच्या अंतर्गत सुधारित प्रस्ताव बनविण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, तेथील वन्यजीव आणि पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने नॅरो गेजचे ब्रॉडगेज करण्याचा विचार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

000

मेडीगट्टा प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : मेडीगट्टा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात (बॅक वॉटर) येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मेडीगट्टा प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात येणाऱ्या एकूण 18 गावांतील 369.13 हेक्टर खासगी जमिनींपैकी  234.92 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून उर्वरित जमीन संपादनाची कार्यवाही सुरु आहे. यापूर्वी थेट खरेदीने ताब्यात घेतलेल्या जमिनीला देण्यात आलेले मूल्यांकन विचारात घेऊन संबंधित जमीन मालकास वाजवी मोबदला मिळण्याच्या दृष्टीने निवाडा करुन भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

जव्हार तालुक्यातील मनमोहोडी गावाचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत

मुंबई, दि. 24 : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील मनमोहोडी या गावातील रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पूर्ण करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी  विधानपरिषदेत सांगितले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील मनमोहोडी या गावातील आदिवासी ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले की, या भागात विद्युतीकरण तसेच मूलभुत सोयीसुविधा शासनाने पुरविल्या आहेत. हे गाव मनमोहोडी ते डोंगरपाडा या रस्त्याने जोडलेले आहे. याशिवाय रा.मा.क्र.७७ ते मनमोहोडी या रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा निवड समितीने मान्यता दिलेली आहे. जलजीवन मिशन अतंर्गत २०२२-२३ मध्ये ३७ लाख ८३ कामांना मंजुरी आहे, असेही आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने सदस्य मनीषा कायंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here