विधानसभा लक्षवेधी

केमिकलमिश्रित हळदीच्या वापराला आळा घालण्यासाठी लवकरच बैठक –  मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 25 : काही देवस्थानांच्या ठिकाणी केमिकल मिश्रित हळदीचा वापर केला जातो. येणाऱ्या काळात यावर उपाययोजना करण्यासाठी  लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि अन्न व औषध प्रशासन अशा तीन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी हळदीमध्ये होत असलेली भेसळ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, आयुर्वेदातील हळद हे एक महत्वाचे पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. राज्यात हळदीच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. हिंगोली येथे स्थापन होणाऱ्या हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण लागू करण्यात आले आहे. आगामी काळात हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

वर्षा आंधळे/विसंअ/

 

नदी रुंदीकरणातील पाच प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन तत्काळ करण्याचे निर्देश –  मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 25 : पोयसर नदी रुंदीकरण प्रकल्पातील 5 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन तातडीने करण्याचे निर्देशित करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुनील प्रभू, रवींद्र वायकर आणि सुनील राणे यांनी ‘प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन’ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की,  मालाड येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 21 मे 2021 रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामातील 197 प्रकल्पबाधितांपैकी 10 प्रकल्पबाधित हे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील आहेत. आतापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 187 प्रकल्पबाधितांची पात्रता निश्चित करण्यात आली असून 185 प्रकल्पबाधितांपैकी 175 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मालाड पूर्व येथे कायमस्वरुपी करण्यात आले आहे, तर 10 पैकी 5 प्रकल्पबांधितांचे पुनर्वसन यापूर्वी करण्यात आले असून आज उर्वरित 5 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कायमस्वरुपी करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच 2 अपात्र बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.

मुंबई उपजिल्हाधिकारी  (अतिक्रमण/ निष्कासन) यांनी तयार केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 10 प्रकल्पबाधितांपैकी 5 प्रकल्पबाधित हे 1 जानेवारी 2000 नुसार पात्र असून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित 5 प्रकल्पबाधित हे सशुल्क पात्र असून त्यांचे धारेण नसल्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. 1 जानेवारी 2000 ते 1 जानवेारी 2011 पर्यंतच्या पुनर्वसन योग्य झोपडपट्टीना सशुल्क पुनर्वसन करण्याचे धोरण 16 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आले आहे. सशुल्क पुनर्वसनास पात्र असलेल्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकांचे शुल्क निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

वर्षा आंधळे/विसंअ/

 

फिनले मिलसंदर्भात 5 एप्रिलला बैठक घेणार – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 25 :  एनटीसीअंतर्गत येणारी फिनले मिल 25 मार्च 2020 पासून पूर्णत: बंद आहे. येत्या 5 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत या मिलसंदर्भातील सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी फिनले मिल बंद असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोविडपासून एनटीसीच्या फिनलेसह सर्वच मिल पूर्णत: बंद आहेत. मध्यंतरी जानेवारी 2021 पासून 4 ते 5 महिने फिनले मिल सुरु करण्यात आली होती. पण, परत ती बंद पडली. एनटीसीच्या सर्वच गिरण्या 25 मार्च 2020 पासून बंद असल्याने महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. एनटीसीच्या मिल सुरु कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने फिनले मिलचे पुनरुज्जीवन करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती वस्त्रोद्योग विभागाकडून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला करण्यात आलेली आहे.

वर्षा आंधळे/विसंअ/

 

आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे पुसट येत असल्यास लाभार्थींना कार्ड नॉमिनी सुविधा – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 25 : अनेक वृद्ध व्यक्तींच्या बोटांचे ठसे पुसट येत असल्याने आधार प्रमाणीकरण करताना समस्या निर्माण होतात. आता अशा लाभार्थींसाठी ‘कार्ड नॉमिनी’ सुविधा 29 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी रेशन वाटपाबाबच्या धेारणात बदल करण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, 14 हजार 282 लोकांनी आतापर्यंत कार्ड नॉमिनी सुविधेचा लाभ घेतला आहे. येणाऱ्या काळात बोटांचे ठसे न मिळाल्यास नवीन तंत्रज्ञान वापरुन लाभार्थींचे ‘आय इम्प्रेंशन’ करुन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठी अभ्यास करण्यात येत आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत रास्त भाव दुकानातील शिधा वितरण करताना लाभार्थींची बायोमेट्रिक ओळख झाल्यांनतर शिध्याचे वितरण होते. जानेवारी 2023 च्या अन्नधान्याचे वितरण करण्यात आले असून फेब्रुवारी 2023 मधील अन्नधान्याचे वाटप सुरु आहे. एखाद्यावेळेस तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थींला अन्नधान्य न मिळाल्यास त्या महिन्याचे अन्न ई-पॉस मशीनमध्ये कॅरी फॉरवर्ड होऊन त्या लाभार्थ्यांला पुढील महिन्यात मिळते. सलग 3 महिने शिधापत्रिकेवर अन्नधान्य न घेतल्यास लाभार्थींचे अन्नधान्य बंद करण्यात येत नसल्याचे मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

वर्षा आंधळे/विसंअ/ 

एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 25 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खननाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली असून या पथकाने एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 662 प्रकरणात कारवाई करण्यात आली असून दंडात्मक रक्कम वसूल करून शासनस जमा करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय अवैधपणे दगड उत्खनन करून क्रशर चालविण्यात येत आहेत, अशा खडीक्रशरवर कारवाई करून बंद करण्यात आले आहेत असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

राष्ट्रीय संरक्षण अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 25 : “नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार आहे”, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील मौजे नायगाव येथे महाज्योती संस्थेमार्फत मुलीकरिता निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास 24 कोटी रुपयांचा निधी महाज्योती संस्थेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात असून जागा हस्तांतरणाची कार्यवाही चालू आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

धाराशिवमध्ये अवैध दारु विकणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या हद्दपारीचे निर्देश देणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. 25 : अवैध पद्धतीने दारु विक्री करणाऱ्या व्यक्तीवर तीनपेक्षा जास्त गुन्हे नोंद असल्यास त्या व्यक्तीस जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे निर्देश देण्यात येतात. धाराशिवमधील दोन व्यक्तींवर अनुक्रमे 4 आणि 5 गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात अवैध दारु विक्री सुरु असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणण्यात येत आहे. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांची संख्याही 12 वरुन 25 करण्यात आली आहे.येणाऱ्या काळात अवैध दारु विक्री रोखण्यासाठी अधिक भरारी पथक आणि तपासणी नाक्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदभरती टीसीएस कंपनीमार्फत केली जाणार असून एकूण 667 पदे 5 महिन्यांमध्ये भरण्यात येणार आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथम इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

बुलढाण्यातील एनएल हेल्थ केअर सेंटरच्या कामांबाबत विभागीय चौकशी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 25 : बुलढाणा येथील जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयामार्फत एन.एल. हेल्थ केअर सेंटरला देण्यात आलेल्या कामाबाबत तक्रारी असल्याने याप्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक येथील कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

डॉ. सावंत म्हणाले की,  एन.एल. हेल्थ केअर सेंटरला मॉड्युलर ओटी आणि लेबर रुम तयार करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा पुरवठा आदेश देण्यात आला असून याबाबत 80 टक्के काम करण्यात आले आहे.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

 ‘स्वाधार’ योजना तालुकास्तरावर नेणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 25 : सध्या जिल्हास्तरावर स्वाधार योजना राबविण्यात येत असून आगामी काळात ही योजना तालुकास्तरावर नेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य लहू कानडे, बळवंत वानखेडे, दीपक चव्हाण अणि प्रा. वर्षा गायकवाड यांनी ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणारी तरतूद’ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक कल्याणाकरिता विविध योजना राबविल्या जातात. यावर्षी आतापर्यंत उपलब्ध झालेल्या निधींपैकी 72 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. तर आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी 80 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील शासकीय निवासी वसतिगृहामध्ये लिप्ट कार्यान्वित करण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील. याशिवाय विभागामार्फत देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना आणि ‘स्वाधार’ योजनेत काही अनियमितता झाली असल्याचे दिसून आल्यास याबाबतही आयुक्तांमार्फत तपासणी करण्यात येईल, असेही श्री. राठोड यांनी सांगितले.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 25 : भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी या रुग्णालयाच्या कामासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

डॉ. सावंत म्हणाले की,  या रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासंदर्भात 10.38 कोटी रुपयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केले होते. त्यापैकी 5 कोटी 95 लाख निधी मंजूर होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आला असून या विभागामार्फत रुग्णालयातील कामे करण्यात येत आहे. आता हे रुग्णालय 100 खाटांवरुन 200 खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. इमारतीमधील विद्युत कामांकरीता कार्यकारी अभियंता, ठाणे यांना 10.59 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दिले आहे. आगामी काळात दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

रुग्णवाहिकेसंदर्भात लवकरच नवीन धोरण आणणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 25 : रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यादृष्टीने रुग्णवाहिका जलद गतीने उपलब्ध होण्याबरोबरच याबाबतची नवीन कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी नवीन धोरण आणण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर, राजेश पवार, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याबाबतची  लक्षवेधी सूचना मांडली होती.

डॉ. सावंत म्हणाले की,  रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. तर रुग्ण मृत झाल्यावर शववाहिकेची आवश्यकता असते. दोन्हींची आवश्यकता असली तरी त्याची रचना वेगळी असते. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत एक निश्चित धोरण ठरविण्यात येत आहे. शहरांपासून गावांपर्यंत दोन्ही वाहिका तातडीने उपलब्ध होण्यासाठी नगरविकास, ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य यांची एक संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

– मंत्री उदय सामंत

मुंबई, दि.25: केंद्र शासनामार्फत अमृत योजना 2 ला निधी देण्यात येतो. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुलभा खोडके यांनी अमृत 2 योजनेंतर्गत करावयाची कामे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की,  राज्यात केंद्र पुरस्कृत अमृत – 2 अभियानाची अंमलबजावणी 14 जुलै 2022 पासून करण्यात येत आहे. अमरावती शहर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्यसा अमृत – 2 अभियानाच्या पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून या अभियानासाठी निधी न आल्यास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीसमोर सादर करण्यात येईल.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

त्रयस्थ तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच देयके अदा – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 25 : सिन्नर नगरपरिषदेअंतर्गत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरस्वती नदी सौंदर्यीकरण व विकास कामे हाती घेण्यात आली. याबाबतची कामे करताना ई निविदा प्रक्रिया अवलंबून न्यूनतम धारकास काम देण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर तसेच कामाची गुणवत्ता त्रयस्थ तपासणी अहवाल आल्यानंतरच संबंधित कंत्राटदारास देयके अदा करण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात आलेल्या निकृष्ट कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की,  नदीतील गाळ काढणे, नदी काठी संरक्षक भिंत बांधणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे इत्यादी कामे यावेळी करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली असून त्यांच्याकडून संबंधित कंत्राटदाराने काम समाधानकारक केल्याचा अहवाल दिला आहे.

सिन्नर नगरपरिषदेने पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराकडून ताब्यात घेतलेली नाही. सदर पाणी पुरवठा योजनेकरिता नियुक्त्‍ कंत्राटदाराने करारातील तरतुदीनुसार प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यापासून 1 वर्ष कालावधीसाठी देखभाल करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराला प्रकल्प पुर्णत्वाची तारीख अमान्य असल्याने मा. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे.लवकरच सिन्नर नगरपरिषदेसंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे मंत्री सामंत यावेळी म्हणाले.

00000

वर्षा आंधळे/विसंअ/