मुंबई, दि. 25 : मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न सामाजिक न्याय विभागाने अन्य संबंधित विभागांच्या समन्वयाने कालबद्ध पद्धतीने सोडवावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत विधान भवनातील समिती कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, अमित देशमुख, नारायण कुचे, दीपक चव्हाण, राजेश पवार, राजेश राठोड, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, राम सातपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक श्री. वारे आदी उपस्थित होते. यावेळी विक्रोळी कन्नमवार नगर धोकादायक इमारती पुनर्वसन बैठकीचे आयोजनही करण्यात आले. या बैठकीला आमदार प्रा.वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. तसेच वसतिगृहबाबत बैठकीला आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
लहुजी उस्ताद साळवे आयोगाने मातंग समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या शिफारसी व शिफारसींनुसार संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा. ‘बार्टी’कडून प्रकाशित होणाऱ्या प्रकाशनांबाबत आचारसंहिता असली पाहिजे. ‘बार्टी’ ने मातंग समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अहवाल सादर करावा. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कार्यवाहीच्या आढाव्यासाठी एक महिन्यात पुन्हा बैठक लावण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.
बैठकीत मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण, ‘बार्टी’मार्फत तसेच अण्णाभाऊ साठे आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, सांगली जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे स्मारक, मुंबई येथील स्मारक, लहुजी साळवे यांचे स्मारक आदी कामांचाही आढावा घेण्यात आला.
विक्रोळी येथील कन्नमवार नगर व अन्य ठिकाणी असलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाबाबतही आढावा घेण्यात आला. या प्रश्नाबाबत सोसायट्यांच्या अध्यक्षांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे राज्यातील वसतिगृहांमधील भोजन, निवास आदींचे प्रश्न सोडविण्यात यावे. वसतिगृहांमध्ये अनियमितता झाली असल्यास ती दूर करावी. याबाबत वसतिगृहांच्या तपासण्या कराव्यात, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडले. सचिव श्री. भांगे यांनी बैठकीत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००
निलेश तायडे/ससं/