अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 25 : “अलिबाग – रोहा दरम्यान रस्त्याचे काम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेले आहे. या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. तसेच या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे”, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिले.
अलिबाग -रोहा रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटदार कंपनीने गैर व्यवहार केल्याबद्दल तारांकित प्रश्न विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, अलिबाग – रोहा रस्ता पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या देखील घेतल्या आहेत. लोकहिताच्या कामांमध्ये कोणाकडून अडथळा आणल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.
या प्रश्नाच्या अनुषंगाने विधानपरिषद सदस्य सर्वश्री कपिल पाटील, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/
छत्रपती संभाजीनगर शहरातील उड्डाणपुलांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार – मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 25 : छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. 90 टक्के कामे पूर्णत्वाकडे गेले आहेत. मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही पुलांची कामे एप्रिल महिनाअखेर पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरात जुन्या बीड बायपास, स्वामी हंसराज तीर्थ चौक यासह विविध ठिकाणी कामे सुरु आहेत. स्वामी हंसराज तीर्थ चौकात बायपासच्या नव्या पुलाखालून अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्याची उंची कमी ठेवल्याची तक्रार होती. मात्र, ही उंची 5.50 मीटर इतकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या या कामांपैकी 13 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांपैकी 11 किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे तसेच 4.75 कि.मी. चौपदरीकरण कामांपैकी अडीच कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही कामे एप्रिल महिनाअखेरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.
००००
दीपक चव्हाण/विसंअ/
अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 25 : राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन आणि अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य रामदास आंबटकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, ज्या ठिकाणी शाळांची पटसंख्या कमी आहे, अशा शाळा एकत्रित करुन तिथे पूर्णवेळ ग्रंथपाल उपलब्ध करुन देता येईल का, याचा विचार सुरु आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय, शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहोत. शाळांमध्ये ई- ग्रंथालय सुरु करीत आहोत. पुढील वर्षीपासून प्रत्येक शाळेत पुस्तकपेटी योजना आणि डिजीटल लायब्ररीचा उपक्रम आपण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शालेय शिक्षणात गुणात्मक फरक पडेल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, प्रविण दरेकर, कपिल पाटील, भाई जगताप, महादेव जानकर, प्रसाद लाड आणि जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.
००००
दीपक चव्हाण/विसंअ/