विधानसभा लक्षवेधी

0
8

मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य सुनिल राणे, प्रकाश अबिटकर,सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीचीही छाननी करुन पात्र लोकांची यादी कालमर्यादेत तयार करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या घरांसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन या कामाला अधिक गती देऊन प्राधान्य देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

बोर, धाम प्रकल्पातील दुरुस्ती कामांना गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. : 25 : वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम हे सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प आहेत. परंतु जुना प्रकल्प असल्याने कालवे व वितरण प्रणाली जीर्ण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य पंकज भोयर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी एका महिन्यात विस्तृत प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि, 25 : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 12 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या आदिवासी भागातील गावांना कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाच्या जलाशयावरुन शेतीसाठी कळमजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती. त्यानुसार या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याप्रकल्पासाठी आवश्यक तो निधीही देण्यात येईल आणि उपलब्ध पाणीसाठा याचा अंदाज घेऊन या 12 गावांच्या आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि. 25 : जिगाव प्रकल्पात मोठी सिंचन क्षमता तयार करण्यात येत आहे. यामध्ये अधिक सिंचन क्षमता उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले तर मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे या लाभक्षेत्रात समाविष्ट करुन त्यांना लाभ देता येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे  लाभक्षेत्राबाहेरील आहेत. या गावांचा समावेश या प्रकल्पात करत असताना अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध असणे महत्वाचे आहे. म्हणून पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाला निधी देण्यात येईल,त्यानंतर या गावांना लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. : 25 : अंधेरी पश्चिम येथील जुननत नगर, समतानगर आणि खजूरवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या जागेवर अनधिकृत संक्रमण शिबिरे उभे करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीबाबत कार्यवाही करण्यात येईल. परिशिष्ट दोनची पुनर्पडताळणी करुन त्यातील निकष तपासून या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून सन 2019 च्या सर्वेक्षणाप्रमाणे परिशिष्ट-दोन मधील सुधारणा करुन या प्रकल्पाला गती देण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

ततारपूर, सावरखेड, गणोजादेवी पुनर्वसन प्रकल्पाला लवकरच मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. : 25 : अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पांतर्गत ततारपुर आणि सावरखेड पुनर्वसनाचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत. गणोजादेवी संदर्भातलाही प्रस्ताव तातडीने मागवून पुढील 3 महिन्यात या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य रवी राणा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, निम्न पेढी प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम झाले आहे. परंतु 10 टक्के काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच 50 घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

निम्न तापी प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेला निम्न तापी पाडळसे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त सहाय्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

 

याबाबत विधानसभा सदस्य संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा 6.6 टीएमसी चा प्रस्ताव प्राप्त झाला आहे परंतु तो प्रस्ताव 4 टीएमसीचा अपेक्षित असून याबाबत पुर्नप्रस्ताव मागवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

सोलापूर शहर पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 25 : सोलापूर शहर पाणीपुरठ्यासंदर्भात कंत्राटदारांना देण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस वारंवार स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुभाष देशमुख यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, उजनी धरणावरून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी 170 द. ल. लि. उजनी ते सोलापूर थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा प्रकल्पाची योजना सोलापूर स्मार्टसिटी मार्फत तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन, बी.पी.टी. ग्रॅव्हिटी मेन या कामांचा समावेश आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

महाकाली, देवीपाडा गृहनिर्माण प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : मुंबई उपनगरातील मागाठाणे, बोरिवली येथील महाकाली व देवीपाडा गृहनिर्माण प्रकल्पाचा  अनेक वर्षापासून पुनर्विकास रखडला आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात अनेक विकासक बदलले असल्याने यामध्ये जास्त कालावधी गेला. आता या प्रकल्पाचे  काम सुरू झाले आहे. यामध्ये विकासकाकडे 20 कोटी रुपये थकीत होते. त्यापैकी 11 कोटी रुपये दिले आहेत. अजून 9 कोटी रुपये थकीत रक्कम आहे. विकासक अनेक वेळा झोपडीधारकांना भाडे देत नाहीत, अशा तक्रारी येत आहेत. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. विकासक आणि झोपडीधारक यांना दिलासा देण्यासाठी शासन भाडे रक्कम बाबत नवीन योजना आखत आहे. या योजनेत जे विकासक नाविन्यपूर्ण आणि कालबद्धपूर्ण प्रकल्प आराखडा तयार करून नियोजन करतील, अशा विकासकांना आणि झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनींच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि.25: कर्नाटक राज्याला वीज निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनी अधिग्रहित करुन कोळसा उत्खननाकरिता देण्यात आल्या आहेत. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन हे काम करीत असून काही प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरच या विषयाबाबत बैठक घेण्यात येईल, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य किशोर जोरगेवार यांनी कोळसा उत्खननाकरिता घेण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांना मिळणारा मोबदला या कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की,  कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर 15 डिसेंबर 2016 रोजी करार करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळालेला मोबदला याबाबत तक्रारी असल्याने यासंदर्भात लवकरच एक सविस्तर बैठक घेण्यात येईल.

००००

वर्षा आंधळे/विसंअ 

निकषपात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. २५ : राज्यात १ लाख ८ हजार ७५९ आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्र दिले गेले आहे. निकषपात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य समाधान अवताडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात जिथे आवश्यक आहे, तिथे जात पडताळणी कार्यालय उघडले आहेत.जात वैधता समितीची संख्या सातत्याने वाढविण्यात आली आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत मोजणी करून हद्द निश्चित करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 25 : मशिद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारतींचे अतिक्रमण झालेले नाही. मशिद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये असल्याने त्यांच्या हद्दी जवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अबू आझमी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

अहमदनगर शहरातील मशीद व दर्ग्यांच्या जागांसंदर्भात अतिक्रमण झालेले नाही, असे मंत्री श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here