मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

            मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

            मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबीरे आयोजित करावी. समाजाच्या विविध मागण्यांबाबत संघटनांसोबत जिल्हानिहाय बैठका घेवून समस्या सोडवाव्यात. योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांची यादी तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

            सद्यस्थितीत मातंग समाजाच्या विकासाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार, कर्ज पुरवठा आदी सोयीसुविधा मातंग समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी विभागाला दिल्या.

०००००

पवन राठोड/स.सं