सातारा, दि. 28 :- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431 शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा लाभ दिला असून ही योजना राबविण्यात सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.
शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. पिक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शासन निर्णय दि. 11 जून 2021 अन्वये सन 2021-2022 वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना 0 टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळत आहे. हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात स्टेट पुल (सर्वसाधारण) मधून 3 लाख 13 हजार 188 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांचा लाभ, जिल्हा नियोजन समिती (सर्व साधारण) योजनेमधून 81 हजार 310 शेतकऱ्यांना 12 कोटी 99 लाख 99 हजार 985 , समाज कल्याण विभाग (विशेष घटक योजन) मधून 933 शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांचा असे एकूण 3 लाख 95 हजार 431 शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा या योजनेंतर्गत लाभ देऊन ही योजना राबविण्यात राज्यात सातारा जिल्हा अव्वल ठरला आहे.