मिरज दर्गा येथे आवश्यक सुविधांसाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
8

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्ग्याचा आणि मिरज येथील सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.

मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा हा सुमारे 600 वर्षापूर्वीचा असून दर्ग्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सौंदर्य व पावित्र्य याचा समतोल राखत नवीन विकास आराखडा येत्या दोन आठवड्यात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकास आराखडा करताना दर्ग्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारावा. दर्ग्यासमोरील अतिक्रमणे काढावीत. आराखड्यामध्ये वाहनतळ, सर्व सोयीयुक्त यात्री निवास, नगारखाना, प्रवेशव्दार व कमान, फायर फायटिंग, सोलर सिस्टिम, अंडरग्राउंड वायरिंग, चौक सुशोभिकरण व दर्ग्याच्या शेजारी असणाऱ्या सरपंच कार्यालयाचे नूतनीकरण या बाबीनाही प्राधान्य द्यावे. 

याबरोबरच इदगाह मैदान, खासबाग परिसर, अनुभव मंडप, तंतूवाद्य भवन, चर्मकार समाज भवन आदी बाबींचा सर्व समावेशक विकास आराखडा समावेश करावा. जैन समाजाच्या मुलांसाठी असलेल्या वस्तीगृहाची दुरुस्ती व दीपस्तंभ, ख्रिचन समाज स्मशान भूमी व पंढरपूर रोडवर असणाऱ्या चर्च परिसरातील दुरुस्तीची कामे आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषण करणाऱ्या कारखाने, कंपन्या, यंत्रणांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री

जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या  कारखाने, कंपन्या, यंत्रणा यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

कृष्णा नदीत 10 मार्च 2023 रोजी मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले, या घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांचा व त्यावरील केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रदूषण नियंत्रण महामंडळ व प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. औताडे यांच्यासह सबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

कृष्णा नदीत सोडण्यात येत असलेल्या प्रदूषीत पाण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, महानगरपालिकेच्या पंपहाऊसमधील पंप वारंवार बंद पडत असल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. ही अत्यंत दुर्देवी घटना असून नागरिकांच्या आरोग्यालाही यातून मोठ्या प्रमाणावर धोका संभवू शकतो. त्यामुळे या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या यंत्रणा, वरिष्ठ अधिकारी यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षापासून शेरीनाल्यावरील एसटीपी प्लाँट चे काम सुरू आहे. सदरचा प्लाँट तात्काळ पूर्ण करून सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्न गांर्भियाने सोडविणे आवश्यक आहे. प्रदूषित पाणी नदीत मिसळू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना त्वरीत करा. सन 2022-23 आणि 2023-24 मध्ये प्रदूषण टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिकेकडील यंत्रणांनी तात्काळ सादर करावा. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सदैव सज्ज असणे आवश्यक आहे. नदी प्रदूषणासाठी जबाबदाऱ्या असणाऱ्या घटकांना प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनानेही नोटीसा बजावाव्यात. यावेळी त्यांनी सावळी येथील भूजल प्रदूषणाबाबतही चर्चा केली.  जिल्ह्यात नदी प्रदूषण करणाऱ्या तसेच हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने स्पेशल ड्राईव्ह घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here