गोसीखुर्द प्रकल्पामध्ये होणार ‘जलपर्यटन प्रकल्प’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

मुंबई, दि. 29 : “राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल”, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकासाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक श्रद्धा जोशी उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विशेषतः, दुर्गम भागात कमी वेळेत पर्यटनस्थळाच्या विकासात जलपर्यटन महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होते तसेच रोजगाराच्या संधी वाढतात. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे गोसीखुर्द जलाशय आणि परिसराचा जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे.

“जगातील बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटन हा मुख्य घटक मानला जातो आणि राज्य शासन राज्यातील पर्यटन विकासावर विशेष लक्ष देत आहे. या सामंजस्य कराराद्वारे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होऊन स्थानिक तरुणांसाठी 80 टक्के रोजगार निर्मिती होईल. तसेच पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन निर्माण होईल. राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मोहिते यांनी १०१ कोटी रूपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्पाची प्रस्तावित माहिती, पायाभूत सुविधा, जलपर्यटन, पर्यटकांची व वाहतुकीची अंदाजित संख्या, प्रकल्पाचे लाभ याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सहसचिव संजय टाटू, उपसचिव नमिता बसेर, कार्यकारी अभियंता सोनल गायकवाड आदी उपस्थित होते.

******

संध्या गरवारे/विसंअ/