गिरीश बापट यांच्या निधनाने ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 29 : पुण्याचे खासदार आणि विधिमंडळातील माझे सहकारी मित्र गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. 1973 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या गिरीष बापट यांनी पुण्यासह महाराष्ट्रात पक्षाच्या यशस्वी वाटचालीत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने एक लढवय्या नेता हरपला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

“टेल्को कंपनीत 1973 मध्ये काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या बापट यांनी नगरसेवक, आमदार, राज्यातील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार असलेल्या बापट यांनी पुण्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून बापट यांनी भरीव कामगिरी केली. २०१९ पासून पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले. तेव्हापासून पुण्याच्या विकासाला त्यांनी अधिक वेग दिला. बापट यांच्या जाण्याचे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो”, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/