राज्यात २१ ते २८ मे दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

0
1

मुंबई, दि. 31 : पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमि परिक्रमा’ या अंतर्गत 21 ते 28 मे 2023 दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विचार जागरण सप्ताह’ आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यांची जन्मभूमी भगूर येथे भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधण्यात येणार आहे. ‘वीरभूमि परिक्रमा’ या अंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ आयोजित केला जाणार आहे. या कालावधीत अभिवादन यात्रा, लिटरेचर फेस्टिव्हल, गीत वीर विनायक, वीरता पुरस्कार महानाट्य,कौतुक सोहळा आणि कीर्तनसेवा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकतेचा पाया घातला. येथे त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना मुक्त प्रवेश असलेले पतितपावन मंदिर उभारले आणि मुलींसाठी शाळाही सुरू केली. अंदमाननंतर येथील कारागृहात त्यांनी दोन अडीच वर्षे कारावास आणि 13 वर्षे स्थानबद्धतेची शिक्षा भोगली आहे. नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर आणि नाशिकमध्ये त्यांच्या क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात आणि अभिनव भारताची स्थापना केली. सांगली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर काही काळ वास्तव्यास होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले, तेथे त्यांचे स्मारक आहे.पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी होते आणि परदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी केली. मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्याच्या शेवटच्या वर्षात राहिले. वैचारिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून सावरकर सदन मध्ये त्यांनी आत्मर्पण केले. या पाच ठिकाणी जयंती सप्ताहाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, असेही श्री. लोढा यांनी सांगितले

मंत्री श्री लोढा म्हणाले, आगामी कालावधीत मान्सून धमाका हा पर्यटन विभागामार्फत उपक्रम राबवला जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला यंदा आठ कोटी रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. या विभागाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

000

संध्या गरवारे/विसंअ/31/03/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here