‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

मुंबई , दि. ३१ : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात.

यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

00000

 वर्षा आंधळे/विसंअ/31.03.2023