नागपूरच्या क्रीडा विकासात सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
11

नागपूर, दि.1 :-   नागपूर मध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चित आनंद होईल. भारतात सेपक टेकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपुरात रुजली आहे. त्यामुळे या खेळाचे प्रशिक्षण त्यासाठी आवश्यक सुविधा नागपूर येथे उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा विभागीय क्रीडासंकुल मानकापूर येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी सेपक टेकरा खेळाला नागपूरमध्ये पालकत्व देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सेपक टेकरा फेडरेशनचे राष्ट्र्रीय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्र सिंह दाहिया, सचिव श्री विरेगोडा, महाराष्ट्राचे प्रमुख विपीन कामदार, सचिव डॉ. योगेंद्र पांडे, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आयोजक डॉ. अमृता पांडे यांच्यासह या खेळातील मान्यवर खेळाडू उपस्थित होते.

राज्याचे 29 व पोलीस आणि सीमासुरक्षा दलाचे दोन संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. पायाने चेंडूसोबत खेळला जाणारा हा खेळ शारिरीक तंदुरुस्तीची परीक्षा घेणारा आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने हा खेळ खेळला जातो. भारतामध्ये नागपूर शहरात हा खेळ रुजला आहे. नागपूरने या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहे.

यावेळी संबोधित करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर या खेळाची भारतातील जननी आहे. त्यामुळे निश्चितच या खेळाचा लोकप्रियतेसाठी आणि प्रशिक्षणासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय स्तरावरील आयोजक व स्थानिक स्तरावरील आयोजक यांनी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सूचविले. यावेळी वेगवेगळया राज्याच्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत प्रत्येकाने आपले राज्य जिंकावे यासाठी प्रयत्न करा आणि जेव्हा देशासाठी खेळाल त्यावेळी तिरंग्याचा सन्मान राखा, असे आवाहन केले. आजपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम संघ आणि सर्वोत्तम खेळाडू विजयी झाला पाहिजे. अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी जाकार्ता ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूसोबत हितगुज केले. या नवा खेळाचा शुभारंभ प्रत्यक्ष मैदानात उतरुन त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here