नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाणार – पालकमंत्री संदीपान भुमरे

0
6

औरंगाबाद दि. ११ ,(जिमाका) :- कन्नड तालुक्यातील  जेऊर, निपाणी, औराळा,  आणि फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करावा. एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी दिली.

जेऊर येथील शेतकरी अशोक पवार, निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या शेतातील कांदा पीक, संजय पवार यांच्या बाजरी पिकाच्या तसेच शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट देत नुकसानाची पालकमंत्र्यांनी पाहणी करून त्यांना धीर दिला.

पीकानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. ज्वारी, बाजरी, कांदा, आणि इतर फळपिकांचा समावेश मदतीमध्ये होणार आहे. कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना संवाद साधताना दिला.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी निपाणी ते औराळा दरम्यानच्या  रस्त्यांची  देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मीना, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, कृषी उपसंचालक प्रकाश देशमुख, तहसीलदार  श्री. वरकड यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

कन्नड तालुक्यातील निपाणी आणि जेऊर या दोन गावातील शेतीच्या पंचनाम्यासाठी दहा तलाठ्यांची नियुक्ती केली असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण होतील, असे यावेळी उपविभागीय  अधिकारी जनार्धन विधाते यांनी सांगितले.

पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी फुलंब्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे आणि तहसीलदार शीतल राजपूत यांनी तालुक्यातील  नुकसान झालेल्या शेतपिकाची  माहिती तसेच करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांबाबत पालकमंत्री भुमरे यांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here