मुंबई, दि. 12 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवार, १३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधणार आहेत.
“आनंदाचा शिधा” संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस), शिवभोजन थाळी या योजनांसंदर्भात लाभार्थींना या शिधाजिन्नसांचे वितरण होत आहे किवा कसे, रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी तसेच समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, संवादासाठी निवडण्यात आलेल्या योजना यासंदर्भात लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
वरील योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे ५० लाभार्थी संबंधित जिल्हा कार्यालयातील NIC च्या Video Conference केंद्रात उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित लाभार्थींपैकी निवडक लाभार्थींशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संवाद साधणार आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
*****
संध्या गरवारे/विसंअ/