मुंबई, दि. 12 : राज्यात निम खारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये रोजगारनिर्मिती आणि शेतीपूरक व्यवसाय असल्याने या क्षेत्रातील संसाधने, क्षमता आणि संधी याबाबतचा आराखडा लवकरच तयार करण्यात यावा, असे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
निम खारे पाणी मत्स्यसंवर्धन बाबतची बैठक मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार भारती लव्हेकर, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आगामी काळात निम खारे मत्स्य/ कोळंबी संवर्धनाकरिता उपयुक्त जागा, निमखारे पाण्यातील संवर्धन योग्य मत्स्य प्रजाती वाढविण्याबरोबरच निम खारे पाणी मत्स्यसंवर्धन यातील संधी शोधणे आवश्यक आहे. पालघर आणि रत्नागिरी येथे अनुक्रमे कोळंबी बीज उत्पादन केंद्र/ कोळंबी सर्वधन प्रकल्प आणि निम खारे पाणी पथदर्शक मत्स्य संर्वधन प्रकल्प असून या प्रकल्पांना गती देण्यात येईल.
बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, चांदा ते बांदा योजनेतर्गत निम खारे पाणी पिंजरा मत्स्य संर्वधनावर भर देण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना रोजगार देणे, मत्स्य प्रजाती संवर्धनामध्ये विविधता आणणे, स्थानिकरीत्या प्रथिनयुक्त अन्ननिर्मिती, निर्यातक्षम मत्स्योपादनाद्वारे परकीय चलन उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/