आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

0
14

अमरावती, दि. १७: नवसारी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या हस्ते आज करण्यात आले.

शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ३६० विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १५ खोल्या व १ अभ्यासिका राहणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने १३ कोटी ३ लाख ११ हजार रुपये मंजूर केले आहेत.

खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्र. गृहप्रमुख गायत्री पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. विद्यार्थिनींची डीबीटीची रक्कम वेळेत जमा केली जाईल. शैक्षणिक सुविधेसाठी विद्यार्थिनींना इंटरनेट सुविधा लवकरच पुरविली जाईल. वॉटर कुलर, वॉशिंग मशीन तसेच आवश्यक सर्व सुविधा वसतिगृहात पुरविल्या जातील. विद्यार्थिनींना इयत्ता बारावीपूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. यासाठी संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात येईल. यासाठी सुनिश्चित वेळापत्रकानुसार कार्यक्रम राबविला जाईल. विद्याार्थिंनींना  शैक्षणिक सत्रासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here