दौलतनगर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २० – दौलत नगर, मरळी ता. पाटण परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या बैठक सभागृहात आयोजित बैठकीवेळी  पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मरळी परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या निधीतून परिसरात दर्जेदार कामे करावीत. परिसरात एक चांगले बालोद्यान उभारावे. शिवसृष्टी, संगीत कारंजे, लेजर शो, मुलांची खेळणी यांची उभारणी करावी. लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे काम लवकर सुरू करावे. पहिल्या टप्प्यातील शिल्लक कामे व निकृष्ट कामांच्या दुरुस्तीची कामे ही तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभयंता श्री. सोनवणे यांनी कामाचा आढावा दिला. त्यामध्ये विश्रामगृह इमारतीचे काम पूर्ण झाल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले. तसेच शताब्दी स्मारकाचे कारंजे व विद्युत रोषणाईचे काम दुरुस्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी लोकनेते बाळासाहेब  देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या दिंडी आयोजनचाही आढावा घेतला. या दिंडीसाठी रस्त्याची कामे करावीत, पोलिसांनी वाहतूक व्यवस्था नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

तसेच पालकमंत्री श्री. देसाई यांनी सुझलॉन कंपनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीही कामगार व कंपनी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. कंपनीने पंधरा दिवसात या विषयी निर्णय घ्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.