मुंबई, दि.२२ : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.
एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे.
या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
०००