उन्हाळ्यात जनावरांची देखभाल

राज्यासह अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे वातावरण बदलेले आहे.परंतु दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात उन्हामध्ये  चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील उष्णता शोषली जाते.शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते व  शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन ताण येतो. जनावरांचे शारिरीक तापमान (१०३ ते ११०अंश फॅरन्हाईट) वाढू शकते .

जनावरांच्या उष्माघाताची कारणे  

  • अति तापमान, आर्द्रता, अतिरिक्त स्नायू काम.
  •  मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारी जड कामे.
  • उन्हात अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा पुरेसे न मिळणे.
  • उपाशी जनावरांकडून कामे करून घेणे.
  • बैलगाडीसह उन्हात उभे ठेवणे, बैलांवरील ओझे कमी न करता त्यांना उन्हात उभे ठेवणे, बांधणे.
  • गोठ्यांचे नियोजन व्यवस्थित नसणे, खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणा, पत्र्याचे छत.
  • दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे.
  • सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात शिरणे.
  • गाई, म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेणे. चरून आल्यावर मुबलक पिण्याचे पाणी न मिळणे.
  • भर उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतणे.

उष्माघाताची लक्षणे

  • वाढलेले शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानाईट ) हे उष्माघाताचे प्रथम लक्षण आहे.
  • जनावराच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो व धापा टाकते, तोंडावाटे श्वास घेतो.
  • त्वचा कोरडी व गरम पडते.
  • खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करते.
  • सुरवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सतत लाळ गळते.
  • जनावरास तहान लागते, जनावर हे पाण्याच्या स्त्रोताकडे जाते, पाण्यामध्ये बसण्याचा किंवा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते.
  • जसजशी शारीरिक तापमानात (१०७ अंश फॅरन्हाईट) वाढ होते, तसतसे जनावर धाप टाकते. अशा अवस्थेत कोसळून खाली पडणे, ग्लानी येणे.
  • घाम गेल्यामुळे, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे असंतुलन होऊन अशक्तपणा येतो.
  • सोडियमची कमतरता झाल्यास जनावरांमध्ये पाणी पिण्याची इच्छा मरते. पाण्याची कमतरता निर्माण होते.
  • तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे पोटदुखीची लक्षणे दिसतात. प्रामुख्याने उठबस कारणे, पाय झाडणे, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट शेण टाकणे ही लक्षणे दिसून येतात.

उपचार

  • जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असतांना चरण्यास सोडावे.
  • हवामानपुरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची ऊंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
  • छप्पराला शक्यतो पांढरा चुना/ रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा/ तुराट्या/ पाचट टाकावे, ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.
  • बर्फाचे खडे हे चघळावयास द्यावेत. त्याचप्रमाणे ते अंगावर, डोक्यावर फिरवावेत
  • परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत, मुक्त संचार गोठयाचा अवलंब करावा.
  • गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा.
  • दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाने, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील.
  • जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.
  • बैलाकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. त्यांना पिण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा.
  • उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो गारवा असलेल्या भागात त्यांना चारा टाकावा.
  • म्हशीच्या कातडीचा काळारंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी,
  • योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे.
  • पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत.

चारा व पाण्याचे व्यवस्थापन

  • जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून ३ ते ४ वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर ३० टक्के वाया जातो.
  • हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे.
  • वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.
  • अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे

प्रतिबंधात्मक उपाय

  • भर उन्हामध्ये जनावरांना चालवण्याचे टाळावे.
  • दुपारच्या वेळी उष्णतामान जास्त असते. जनावरांद्वारे अतिरिक्त स्नायूकाम करून घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रण क्षमतेवर होतो.
  • सकाळचा खुराक न देता उपाशीपोटी जड कामे करून घेतल्यास उष्माघाताची शक्यता दाट असते.
  • जनावरांचा गोठा हा सुद्धा उष्माघात, ताण तणाव याचा एक प्रमुख घटक आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • छताच्या पत्र्यांवर शेतातील तुराट्या, पराट्या, कडबा किंवा इतर वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यात तापमान कमी होते.
  • जनावरांच्या शरीरावर दिवसातून २ ते ३ वेळ थंड पाणी फवारावे.
  • गोठ्यांमध्ये हवा खेळती राहावी यासाठी पंखा, कूलरची सोय करावी.
  • दुपारच्यावेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा लागू नये म्हणून गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाची पडदे लावावीत. यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहील.
  • माजावर असलेल्या गाई, म्हशींना सकाळी, सायंकाळच्या वेळी कृत्रीम रेतन करावे.
  • दूध देणाऱ्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास त्यावरील शारीरिक ताण हा कमी होतो. दूध उत्पादनात वाढ होते.

लेखकः- डॉ .कोमल महेश बेंद्रे,                     

पशुधन विकास अधिकारी ,

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय,अकोला.

(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.)