परभणी, दि. 1 (जिमाका) : राज्य शासन आणि प्रशासनाने विविध अभिनव योजना राबविल्या आहेत. त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून राज्याने देशापुढे वेळोवेळी आपले महत्व अधोरेखित केले आहे, त्याच न्यायाने परभणी जिल्हा देखील प्रगतीच्या वाटेवर आहे. देश, राज्य तसेच आपल्या जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी आपण सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले. महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात जिल्हाधिकारी श्रीमती गोयल बोलत होत्या.
खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार गणेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, समाज कल्याण उपायुक्त श्रीमती गिता गुठ्ठे, महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक सुनिल हट्टेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, विठ्ठल भुसारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे उपस्थित होते.
शासकीय योजनांचा लाभ राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा, या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी विविध सरकारी योजनांचा थेट लाभ जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली मिळण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत -जास्त पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले.
महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रासह देशाच्या विकासामध्ये नेहमीच राज्याने सिंहाचा वाटा उचलला असल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले. राज्य व देशाला प्रगतीपथावर अग्रेसर ठेवणा-या कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नागरिक कटीबद्ध आहोतच. शिवाय यंदा आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्यामुळे त्यानिमित्त जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबवित गोरगरिब गरजू नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बालविवाहमुक्त करणार
परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण मोठे असून, जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी नागरिकांची साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी ‘बालविवाह मुक्त परभणी’ मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. बालविवाह थांबविण्यासाठी मुला-मुलींचे किमान पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतरच विवाह व्हावेत, यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्ह्यातील नागरी भागात सात ठिकाणी ‘हिंदूह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन होत आहे. नागरिकांना स्वस्त दरात अधिकृत रेती डेपोमधून रेती उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे श्रीमती गोयल म्हणाल्या.
जिल्ह्याकरीता १०० खाटांचे सर्व सोयींनीयुक्त नवीन माता व बाल रुग्णालय लवकरच परभणीकरांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.गत पाच महिन्यात अंगणवाडी सेविकांनी जिल्ह्यात दिव्यांग सर्वेक्षण नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात ४० हजार दिव्यांग असून, १०० दिवस दिव्यांगांसाठी उपक्रमातंर्गत सर्व दिव्यांगांना युडीआयडी (वैश्वीक) ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ एकर जागा दिल्यामुळे येथे लवकरच अत्याधुनिक सोयीसुविंधांनीयुक्त क्रीडासंकुल उभारले जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षिततेबाबतची पाहणीबाबत दोन लाख शेतकऱ्यांचा सर्वे करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्रित देणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्राप्त झालेला निधी १०० टक्के खर्च झाला आहे. तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला २९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून जिल्ह्यातील विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि विद्यार्थी उपस्थित होते.
‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्ह्यातील ‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेंतर्गत विजेत्या आरोग्य संस्थांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
‘सुंदर माझा दवाखान’ या मोहिमेंतर्गत पिंगळी, चारठाणा, राणीसावरगाव, धनेगाव, रामपुरी, पालोदी, पडेगाव, खडका, सरफारजपीर, माटेगाव, माळसोन्ना आणि अंबरवाडी येथील विजेत्या आरोग्य संस्थांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर लिखित ‘परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा’ पुस्तकाचे विमोचन खासदार संजय जाधव आणि जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते झाले. समाजकल्याण विभागाच्या वतीने राज्य शासनाच्या विविध योजना, लाभार्थ्यांची माहिती देणाऱ्या यशोगाथा पुस्तकाचे विमोचनही यावेळी करण्यात आले. जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक सुनील हट्टेकर, आदर्श तलाठी रामदास कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती कल्पना दळवी आणि श्रीमती नंदाबाई जोगदंड यांना संयुक्तपणे देण्यात आला.
प्रातिनिधीक नियुक्ती आदेश प्रदान
राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषद, सहायक राज्यकर आयुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयांमधील २१ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात पोलिस परेड कमांडर राखीव पोलिस निरीक्षक आर. बी. दामोदर आणि सेकंड इन कमांडर राखीव पोलिस निरीक्षक व्ही. आर. मुंढे यांनी परेडमध्ये भाग घेतला. तसेच पुरुष प्लाटुन कमांडर सहायक पोलिस निरीक्षक श्री. बाचेवाड, श्री. बोरकर, पोलिस उपनिरीक्षक (महिला) श्रीमती कावळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. कदम, होमगार्ड (पुरुष) बी.टी. तनपुरे, डी. आर. कुलकर्णी, जी. बी. कटारे, पी. बी. ढाके, महिला श्रीमती रंजना बोचरे आणि श्रीमती वाकळे सहभागी आदी झाले होते.