जिल्ह्याची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल-  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0
6
  • महाराष्ट्र दिनाच्या मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण कार्यक्रमात प्रतिपादन
  • सन २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७४५ कोटींचा विकास आराखडा
  • कृषि विभागाच्या विविध योजनांतून १९८ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अदा
  • डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून साडेसोळा कोटींचा लाभ
  • वंदे भारत एक्स्प्रेस, श्री अन्न उत्कृष्टता केंद्रासाठी ऋणनिर्देश

सोलापूर, दि. 1 (जि. मा. का.) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची व लोकोपयोगी कामे होत आहेत. सन 2023-24 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी जवळपास 745 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात चांगली प्रगती करत सोलापूर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कृषि क्षेत्रात जिल्ह्याची भरीव कामगिरी सुरू आहे. गेल्या वर्षी देशभरातून केळीचे सुमारे 16 हजार कंटेनर्स निर्यात झाले. त्यापैकी 50 टक्के कंटेनर्स एकट्या सोलापूर जिल्ह्याचे आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव केळीचे हब बनलेले आहे, याबद्दल अभिमान व्यक्त करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, बळीराजाला बळ देण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांतून एकूण 42 हजार 730 शेतकऱ्यांना 198 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान अदा केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

उन्हाळी हंगामासाठी कालवा प्रवाहीसाठी तीन आवर्तनांसह चालू सिंचन वर्षामध्ये सिंचनाची एकूण पाच आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेती उत्पादनात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करून श्री. शंभरकर म्हणाले, विहित मुदतीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मागील वर्षी एकूण 31 हजारहून अधिक शेतकऱ्यांना साडेसोळा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर गत वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी रक्कम रूपये 191 कोटी 73 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच चालू वर्षी मार्च व एप्रिलमध्येही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये 3 कोटी 92 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही अनुदाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात जवळपास 3 लाख 70 हजार कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, महाराष्ट्र दिनापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतून जिल्ह्यात नऊ नागरी आरोग्य केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत. या केंद्रांमध्ये विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येणार आहेत. तसेच, रूग्णांना मोफत औषधे व 30 प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस व श्री अन्न उत्कृष्टता केंद्र या निर्णयांसाठी त्यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. जिल्हा परिषदेने विविध उपक्रमात राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल व ऑपरेशन परिवर्तनसाठी झालेल्या गौरवाबद्दल विशेष अभिनंदन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य वृध्दीकरिता अल्प कालावधीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याअंतर्गत दिनांक 5 मे ते 6 जून या कालावधीमध्ये मोफत व्यवसाय मार्गदर्शन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सर्व इच्छुक तरूणांनी सदर समुपदेशन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याकरिता जवळच्या जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शुभेच्छा संदेशाच्या प्रारंभी श्री. शंभरकर यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्मांना तसेच, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या महान विभूतींना अभिवादन केले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत धूनवादन झाले. त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग महिला व पुरूष पथक, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक, तसेच, श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, बीडीडीएस, महारक्षक, वज्र वाहन, वरूण वाहन,  अग्निशमन, परिवहनाची वाहने, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त चित्ररथ, रूग्णवाहिका यांनी सहभाग नोंदवला. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थितांची भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. शंभरकर यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेते पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच, राज्य शासनाच्या सेवेत निवड झालेल्या 10 उमेदवारांना आज प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली.

सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल मलकप्पा बणजगोळे यांनी केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन

दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर व जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थींची यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, तहसीलदार अंजली कुलकर्णी आणि दत्तात्रय मोहाळे आदिंसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते ठीक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, वरिष्ठ सहाय्यक भूसंपादन बाळासाहेब वाघ यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे प्रमुख व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here