आसमंतात निनादले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ चे सूर; महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात

0
6

अमरावती, दि. 01 : राष्ट्रगीत व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या मंगलमय सुरांत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात प्र. विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अविनाश बारगळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर महाराष्ट्रगीत झाले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चे मंगलमय सूर आणि उत्साहाने क्रीडा संकुलाचा परिसर निनादून गेला होता. विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर विविध सुरक्षा दलांच्या जवानांनी पथसंचलन करून मानवंदना दिली.  विविध पथकांच्या शिस्तबद्ध कवायतीला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते विविध विभागांच्या गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले. तसेच शासनाकडून विविध पदांसाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here