बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे

बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- जिल्ह्याचा समतोल विकास साधत असताना प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

विकास योजना राबविण्यात जिल्हा अग्रेसर असल्याचे सांगत पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील अनेक व्यक्ती व संस्थाचा राज्य व देश पातळीवर गौरव होतो आहे. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील महिला सरपंच शेख मुन्नाबी मुजफ्फर पटेल यांच्या गौरवामुळे महिला सक्षमीकरणाच्या या पर्वात बीड जिल्हा मागे राहिलेला नसल्याचे दिसुन आले आहे. जिल्हाधिकारीपदाची सूत्र देखील दीपा मुधोळ- मुंडे या समर्थपणे सांभाळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन महिलांच्या सहभागी करण्यासाठी मोठे काम करत आहेत. महिला बचत गटांना  32 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे . या बचत गटांनी दिलेल्या मुदतीत शंभर टक्के परतफेडीचा दर राखून राज्यात बीड जिल्हा प्रथम आला असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासन काम करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्यात येत असुन यावर्षी 1 लाख 75 हजार मेट्रीक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांना खरीप हंगामाला सामोरे जाता येणे सोईचे होणार आहे. तसेच पीककर्ज वितरण होण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून विना सिबिल पीक कर्ज देण्यासाठी बँकांना आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसमवेत राज्य सरकार अतिरिक्त 6 हजार रुपये  देणार आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना डीबीटीच्या माध्यमातून 1 हजार 800 रुपये प्रतिव्यक्ती मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री. सावे म्हणाले.

कृषी यांत्रिकीकरणासाठी जवळपास 1 हजार 500 लाभार्थ्यांना 8 कोटी 89 लक्ष रुपये अनुदान, एक रुपया प्रीमियम भरून पिक विमा, नैसर्गिक आपत्तीमध्ये वेळोवेळी नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना पिकांबरोबर जनावरे अथवा कुटुंबातील व्यक्ती दगावल्यास शासकीय मदत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना,  शेततळे, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण यासारख्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बीड जिल्ह्यात जवळपास साडेचार लाख ऊसतोडणी कामगार असून त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शासनाने विविध शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शहरात शिक्षण देण्यासाठी १२ वसतिगृहे उभारण्यात आली असुन लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बीडमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असून त्यासाठी जिल्हा परिषदेने बनविलेल्या संगणक प्रणालीचे राज्यस्तरावर कौतुक झाले असल्याचेही पालकमंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

तीर्थक्षेत्रांच्या विकासालाही जिल्ह्यात अधिक चालना देण्यात येत असल्याचे सांगत राज्याच्या अर्थसंकल्पातून तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी गहिनीनाथ गडाचे संवर्धन व विकासासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींची तरतूद केली असुन नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गावर अंबाजोगाई व परळी वैजनाथ हे दोन तीर्थक्षेत्र येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची”  उपक्रमाची जिल्ह्यात 15 एप्रिल पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी  लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत असुन या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सुरुवातीला पोलीस विभागाच्यावतीने परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनामध्ये पोलीस विभागाचे पुरुष व महिला पथक, गृह रक्षक दलाचे पथक, पोलीस बँड आदिंनी सहभाग घेतला. यावेळी मंत्री श्री. सावे यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदिंची भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सुधाकर गुणवंतराव देशमुख मु. ममदापुर यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार,जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती मनीषा तोकले, महाराष्ट्र पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अंमलदार बालाजी शेषराव दराडे, राजु रूपचंद वंजारे, निलेश भगतसिंह ठाकूर यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या  विविध विभागातील पदासाठी स्पर्धा परीक्षा मार्फत जिल्ह्यातील निवड झालेल्या 16 उमेदवारांना प्रातीनिधीक  स्वरूपात मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच जिल्हा उद्योग केंद्र बीड द्वारा देण्यात येणाऱ्या  जिल्हा पुरस्कार 2022 प्रथम जिल्हा पुरस्कार मे .संकेत स्टील इंडस्ट्रीज, द्वितीय जिल्हा पुरस्कार  नर्मदा देवी कॉटस्पिन यांना प्रदान करण्यात आला.

ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.