लातूर जिल्ह्याच्या यशाचा आलेख आणखी वाढवूया  – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

0
13

लातूर दि.1 ( जि.मा.का )  आयुष्मान भारत अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी या जिल्ह्याच्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यामुळे इथून पुढे जिल्ह्याच्या यशाचा आलेख आणखी अधिक वाढविण्याची आपली जबाबदारी आहे. जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा व वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा विषय हाती घेऊन सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेऊन ती पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज वंदनानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छापर संदेश दिला. यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे,स्वातंत्र्य सैनिक, माध्यमकर्मी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

लातूर जिल्ह्यात आयुष्मान भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ४६ आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १८७ उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याबरोबर २३३ केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण विभागात जवळपास ४४ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले. उपकेंद्रांवरील बाह्यरुग्ण तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०१७-१८ मध्ये उपकेंद्रांवरील बाह्यरुग्ण विभागात केवळ दीड लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. तर २०२१-२२ मध्ये जवळपास साडेनऊ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात २७ हजार ४७५ विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये योगा, मॅरेथॉन, सायकलिंग, वॉकिंग, झुम्बा यासारख्या आरोग्य विषयक जागृती करणाऱ्या उपक्रमांचा समावेश होता. जिल्ह्यात ‘ई-संजीवनी’च्या माध्यमातून ३ लाख १९ हजार २८७ नागरिकांना टेली-कन्सलटेशन सुविधा देण्यात आली. आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या या सर्व आरोग्य सुविधांची दखल केंद्र सरकारने घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी उपक्रमाला यावर्षीचा प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात आला.हे जिल्ह्यासाठी मोठे भूषण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

शासनाकडून शेतकऱ्यांना मदत

अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. मार्च, 2023 मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 22 हजार 565 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने 10 कोटी 56 लाख 55 हजार निधी मंजूर करण्यात आला. गरीब शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्रित माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण सुरु केले आहे. या अंतर्गत जवळपास १ लाख १५ हजार शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये त्या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती घेतली जात आहे. लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण होईल.या माहितीचा आधार त्यांच्या पुढील आर्थिक उन्नतीसाठी महत्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आपल्या संदेशात म्हणाले.

जिल्ह्यातील शेत रस्ते अतिक्रमण मुक्त

जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशावरील नोंद असलेल्या 4 हजार 980 शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. महाराजस्व अभियानातंर्गत 30 एप्रिलपर्यंत  त्यापैकी 4 हजार 585 रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गाव नकाशावर नोंद नसलेल्या 1 हजार 93 शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. 30 एप्रिलपर्यंत यापैकी 971 शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लातूर जिल्हा कचरामुक्त नियोजन

लातूर जिल्ह्यात सर्व नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेच्या धर्तीवर कचरामुक्त शहरांची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत तयार करणे, सुका कचरा विविध घटकात वेगवेगळा संकलित करून त्याच्या विक्रीतून उत्पन्न निर्माण केले जात आहे. याला आता मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात डंपिंग ग्राऊंड निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवत असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या या संदेशात केला.

जिल्ह्यातील युवक – युवतींसाठी कौशल्य विकास

कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 5 मे ते 6 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर मेळावे घेतले जाणार आहेत. यामध्ये दहावी आणि बारावीनंतरचे शिक्षण व अभ्यासक्रम, करिअर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआय पास झालेल्या 1 लाख विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत प्रतिमहिना 5 हजार रुपये प्रतिपुर्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिली

अमृत काळातील राज्याच्या पहिल्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्यात महिला बचतगटांच्या माध्यमातून ‘बांबू क्लस्टर’ विकसित करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे. सोबतच कृषि, वीज, सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्यविषयक तरतुदींमुळे जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला लाभ होणार आहे. राज्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला कुटुंबातील प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य दिले जात होते. या लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी दरवर्षीप्रतिव्यक्ती 1800 रुपये रोख रक्कम त्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा केली जाणार असून लातूर जिल्ह्यातही जवळपास 53 हजार 180 शेतकरी कुटुंबातील जवळपास 2 लाख 48 हजार सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी राज्य सरकारची 6 हजार रुपयांची वाढीव मदत देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून प्रतिवर्षी, प्रतिशेतकरी 6 हजार रुपये जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 2 हजार 686 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत होते. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता ही रक्कम दुप्पट होणार असून आता प्रतिवर्षी, प्रतिशेतकरी 12 हजार रुपये रक्कम वितरीत केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 वयोवृद्ध नागरिकांना आधार

वयोवृद्ध निराधारांच्या उदरनिर्वाहाला आधार म्हणून संजय गांधी निराधार योजना/श्रावणबाळ योजनेतून जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 58 हजार 407 निराधारांना दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. यामध्ये वाढ करून दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजना घोषित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. राज्यात 17 मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 26 एप्रिलपर्यंत लातूर जिल्ह्यातील 17 लाख 84 हजार 501 इतक्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी विकास आराखडा

शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत राज्य शासनाने 2023-24 पासून जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लातूर जिल्हा विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून, त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे साध्य ठरविण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात संभाव्य उष्ण लाट

येणारे कांही दिवस तीव्र उष्णतेचे असल्यामुळे दुपारी 12-00 ते 4-00 या काळात अपरिहार्य करणांशिवाय घराच्या बाहेर पडू नका. या काळात अंग मेहनतीची कामे टाळा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी शेवटी केले आणि महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी यांनी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबिय, पत्रकार, अधिकारी यांना भेटून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here