जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

0
5

पुणे, दि. ९: पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-२० प्रतिनिधींच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए. राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजीत सिंग, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सचे (एनजीईडी) मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनुज कौशल आदी उपस्थित होते.

जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे शहरात जानेवारीमध्ये जी-२० ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची बैठक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. आता जूनमध्ये तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठक अशा दोन बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सांगितले, जी-२० च्या जानेवारीमधील यशस्वी आयोजनाचा अनुभव लक्षात घेत सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी कमीत कमी कालावधीत शहर सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित करुन चांगले काम केले होते. पोलीस विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व काळजी घेतली. भारताचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात येत आहे, असेही श्री. राव यांनी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिकेने गतवेळच्या आयोजनाप्रसंगी राबविलेले उपक्रम, शहर सौंदर्यीकरण आदींविषयी चित्रफीत दाखविण्यात आली. सायकल फेरी (सायक्लॉथॉन), वॉकॅथॉन, स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग, शिक्षण संस्थांमध्ये जी-२० बाबत विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्रांचे आयोजन, चौक सुशोभिकरण, प्रकाशमान करणे मुख्य मार्गांलगतच्या भिंतींवर आकर्षक, रंगकाम आदी उपक्रम कमीत कमी कालावधीत चांगल्याप्रकारे राबवण्यात आल्याचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सांगितले. आगामी बैठकीसाठीही सर्व तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

क्रीडा आयुक्त श्री. दिवसे यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पायाभूत सुविधांची माहिती दिली. बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विभागाने तयार केलेल्या चित्रफीत दाखविण्यात आल्या.

पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, माहिती तंत्रज्ञान संबंधीत तसेच इतर उद्योग, पायाभूत सुविधा आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन येईल. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल लढ्ढा यांच्यासह पर्यटन विभाग, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here