शेती महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सोनेवाडी येथे ‘मल्टिमॉडेल पार्क’ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा

0
9

मुंबई, दि. 9 : महसूल विभागाअंतर्गत येणारे शेती महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे सोनेवाडी येथे मल्टिमॉडेल लॉजिस्टिक आणि बिझनेस पार्क उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले.

शेती महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयेाजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महसूल मंत्री श्री. विखे – पाटील म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी यापूर्वी कार्यान्वित झाला आहे. तर दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी येथील काम पूर्ण झाले आहे. याशिवाय शिर्डी विमानतळावर येथे होणारी गर्दी हे सगळे लक्षात घेऊन आगामी काळात सोनेवाडी येथील एमआयडीसीच्या भूखंडावर मल्टिमॉडेल पार्क उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा.

सोनेवाडी येथे मल्टिमॉडेल पार्क कार्यान्वित झाल्यास येथे अनेक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्योग, रोजगार वाढीसाठी आवश्यक यंत्रणा, आयटी हब येथे कसे एकाच छताखाली आणता येईल का याबाबतचा सूक्ष्म अभ्यास करुन आराखडा तयार करण्यात यावा. समृध्दी महामार्ग आणि शिर्डी विमानतळामुळे थेट औद्योगिक, कृषी आणि इतर उत्पादनांना थेट देशात आणि विदेशात पाठविणे सोपे होईल. फुड पार्क, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, पॅकेजिंग सेंटर यासारख्या सुविधाही येथे उपलब्ध करुन देता येऊ शकतील. त्यामुळे याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार करण्यात यावा, असे निर्देशही मंत्री श्री. विखे – पाटील यांनी यावेळी दिले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here