मुंबई, दि. 10 : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, पक्षकारांची गैरसोय होऊ नये, दस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावी, यासाठी मुंबई शहर, जिल्ह्यातील मुंबई महापालिका क्षेत्रातील एक सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार मुंबई शहर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2, मुंबई शहर क्र. 3 हे कार्यालय प्रत्येक शनिवार, रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती, सह जिल्हा निबंधक साहेबराव दुतोंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नागरिकांच्या सोयीसाठी सह दुय्यम निबंधक वर्ग 2, मुंबई शहर क्र. 3 हे कार्यालय 6 मे 2023 पासून प्रत्येक शनिवार, रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. हे कार्यालय सकाळी 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहणार आहे. पर्यायी सुट्टी प्रत्येक सोमवार, मंगळवार या दिवशी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दस्त नोंदणी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. दुतोंडे यांनी केले आहे.
००००
धोंडिराम अर्जुन/स.सं