मुंबई, दि. 10 : अंधेरी पूर्व येथे कंटेनर अंगणवाडी साठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.
अंधेरी येथील मुंबई महापालिकेच्या के पूर्व वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, अंधेरी पूर्व एमआयडीसी येथे जागा उपलब्ध नसल्यामुळे गणपती मंदिरात अंगणवाडी सुरू केली आहे अशी महिलांनी तक्रार केली असून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ जिल्हा नियोजन समितीमधून कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ५०० तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच ८६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.
यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे दिनांक 11 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ रोजी पर्यंत दुपारी ३ ते 5.30 या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.
****
संध्या गरवारे/विसंअ/