मुंबई, दि. 12 : जी-20 परिषदेअंतर्गत येत्या 21 ते 23 मे 2023 या कालावधीत पर्यावरण, वातावरणीय बदल आणि शाश्वतता कार्यगटाची मुंबईत बैठक होत आहे. या अंतर्गत जुहू बीच येथे स्वच्छता आणि पर्यावरणविषयक जागृती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाच्या सह सचिव नमिता प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.
येत्या 21 मे रोजी देशातील समुद्र किनारा असलेल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबईत जुहू बीच येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी ‘स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ शपथ घेण्यात येईल. किनारा स्वच्छतेबरोबरच वाळू शिल्प, तरंगत्या इलेक्ट्रॉनिक पडद्यावर व्हीडिओच्या माध्यमातून तसेच सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृती आदी उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, जी-20 परिषदेत सहभागी शिष्टमंडळाचे सदस्य, केंद्रीय तसेच राज्याचा पर्यावरण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, किनारा सुरक्षा आदी विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह बीचवरील पर्यटक, विक्रेते, सामाजिक संस्था, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी आणि माध्यमकर्मी आदी सुमारे 700 जण सहभागी होतील.
जुहू बीचवरील कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्रीय पथकासह राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पोलीस विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/