नागपूर दि.12: पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामुळे गुणात्मक परिवर्तन झाले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले असून कायदा व सुव्यवस्था असलेले शहर म्हणून नागपुरची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
लकडगंज येथील आधुनिक सोयीसुविधायुक्त पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच 348 निवासी सदनिका असलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मोहन मते, टेकचंद सावरकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक संदिप बिष्णोई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे अजय गुल्हाने आदी उपस्थित होते.
पोलीसांसाठी निवास संकुल बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला असून राज्यात 1 लक्ष सेवानिवास बांधण्यात येणार असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस स्टेशनच्या बांधकामासोबत निवास संकुल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पोलीस गृहनिर्माण विभागाने बांधकामामध्ये होत असलेला विलंब टाळुन सर्व सुविधायुक्त सेवानिवास प्रकल्पाला गती द्यावी अशी सुचना यावेळी केली.
नागपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानुसार मंजुरी देण्यात येईल. पोलीसांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही सुविधा सुरु राहावी यासाठी बँक ऑफ इंडिया सोबत करार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी डिजिटल हेल्थ फाईल तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर अपघातमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सुचना करतांना शहरातील अपघात व मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अपघात प्रवण स्थळांचा शोध घ्यावा. शहरातील कायदा व सुव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. पोलीस दलाने गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करावी. पुर्व नागपूर येथे शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प सुरु झाले असून नागपूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
लकडगंज येथे देशातील स्मार्ट पोलीस स्टेशन व निवासी संकुलातील बांधकाम पूर्ण झाले असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पोलीस तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी विविध विकास प्रकल्पांच तसेच नागरी सुविधाबद्दल माहिती दिली.
प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करुन लकडगंज स्मार्ट पोलीस स्टेशन, 348 निवासी सदनिका व इतर कार्यालयांच्या बांधकामसाठी 150 कोटी रुपये खर्च झाले आहे. पोलीस दलाला अत्याधुनिक 70 वाहने तसेच 100 हिरो मोटर सायकल उपलब्ध झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. त्यासोबतच पार्डी येथे नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत पोलीस स्टेशनचे बांधकामाचे भुमिपुजन, कामठी येथे पोलीस गृहनिर्माण अंतर्गत 52 गाळ्यांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
यावेळी लकडगंज पोलीस स्टेशन तसेच निवासी संकुल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा सत्कार करण्यात आला. तसेच निवासी संकुलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरांचा ताबा यावेळी देण्यात आला. पोलीस स्टेशनच्या बांधकामसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रसन्न ढोक, विनय सारडा, अनिल सारडा यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपायुक्त गोरख भांमरे तर आभार सहपोलीस आयुक्त अश्वथी दोरजे यांनी मानले.
00000