शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सन्मानार्थ स्टुटगार्टमध्ये अल्फॉन वादनाचा खास कार्यक्रम

स्टुटगार्ट, दि. 14 – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सन्मानार्थ बाडेन-वर्टेमबर्ग राज्याने अल्फॉन वादनाच्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले. अल्फॉन हे बाडेन-वर्टेमबर्ग प्रांतातील पारंपरिक वाद्य असून, त्याचा इतिहास सोळाव्या शतकापर्यंत जातो. विशेष पाहुण्यांच्या सन्मानार्थ त्याचे आयोजन करण्याची त्या राज्याची परंपरा आहे. महाराष्ट्र आणि बाडेन-वर्टेमबर्ग राज्यांचा प्रवास अधिक सहकार्याच्या दिशेने होईल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

सुखद संध्याकाळ, स्वच्छ आकाश, निवडक पाहुणे आणि धीरगंभीर वादनाने काळजाचा ठाव घेणारा वादकांचा ताफा.. बाडेन-वर्टेमबर्गच्या राजधानीतील शनिवार (दि. १३) संध्याकाळचा माहोल असा सूरमयी होता. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी त्याचा आनंद लुटला. त्यांच्या सोबत बाडेन- वर्टेमबर्गचे मिनिस्टर प्रेसिडेंट विनफ्रीड क्रेचमन आणि स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन होते.

अल्फॉन-वादनाचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. श्री. केसरकर यांनीही कुतुहलाने अल्फॉन वाद्य हाताळले. कौशल्य विकास कार्यक्रम, जर्मन पर्यटकांना महाराष्ट्राचा, विशेषतः कोकणचा परिचय करून देणे, मराठी आणि जर्मन भाषांमधील देवाण – घेवाण यासाठी श्री. केसरकर जर्मनीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासमवेत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल व अन्य वरिष्ठ अधिकारी आहेत.

महाराष्ट्राशी स्नेहबंध व मैत्रीचे नाते दृढ करण्यासाठी श्री. केसरकर यांच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्टुटगार्टमधील भारतीय व सुमारे पाचशे जर्मन नागरिक उपस्थित होते..

बाडेन-वर्टेमबर्ग राज्याचे प्रशासकीय व सरकारप्रमुख विनफ्रीड क्रेचमन व डॉ. स्टेकमन यांनी श्री. केसरकर यांचे स्वागत केले. स्वागतपर भाषणांनंतर अल्फॉर्न-वादनाचा कार्यक्रम सुरू झाला. स्वित्झर्लंडचे हे वाद्य या जर्मन राज्याने आपलेसे केले आहे. जवळपास शंभराहून वादकांनी वेगवेगळ्या प्रकारे वादन केले. त्याने वातावरण भारून गेले होते. श्री. केसरकर व त्यांचे सहकारी अधिकारी या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झाले.

महाराष्ट्र आणि बाडेन- वर्टेमबर्ग राज्यांच्या राजधान्यांचे म्हणजे मुंबई आणि स्टुटगार्ट यांचे परस्पर सहकार्य अर्धशतकाहून अधिक काळापासून चालू आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही राज्ये औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली आहेत. पाहुण्यांच्या सन्मानार्थ अल्फॉन-वादन आयोजित केले जाणे, हा चांगला संकेत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांचा प्रवास अधिक सहकार्याच्या दिशेने चालू होईल, असा विश्वास मंत्री श्री. केसरकर यांनी व्यक्त केला आहे.