आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

0
9

औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : पावसाळयाच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी मराठवाडयातील जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी आज मराठवाडा विभागातील आठही जिल्हयांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) मनीष कलवानिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, महवितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे मराठवाडयातील आठही जिल्हयांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्यासह सबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनात संपर्कसातत्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले, आपत्तीपूर्व नियोजन करताना यंत्रणा अद्ययावत असावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. माहिती देणारी साखळी तत्पर ठेवतानाच जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्वदूर संपर्कसातत्य ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही संदेशाला दुर्लक्षित करु नका, आपला दूरध्वनी बंद राहणार नाही याची काळजी घ्यावी. गावातील अंगणवाडी सेविका ते गावात कार्यरत असलेल्या यंत्रणेला विश्वासात घेत गावपातळीवर सातत्याने संपर्कात रहा, अशा सूचनाही श्री केंद्रेकर यांनी यावेळी केल्या.

गोदाकाठच्या जिल्ह्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगून श्री. केंद्रेकर म्हणाले, औरंगाबाद,जालना,परभणी व नांदेड या जिल्ह्यांनी गोदावरी नदीबाबत सर्तकता राखणे गरजेचे आहे. या जिल्ह्यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाऊसस्थितीचा दैनदिन आढावा घ्यावा. जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही श्री. केंद्रेकर यांनी केले.

आपत्ती कालावधीत काम करताना तलाव, रस्ते, घरे व वीज यंत्रणा याबाबत सातत्याने आढावा घ्यावा. पावसाळ्यात साथरोग वेगाने पसरतात.  साथरोगाची संभाव्यता लक्षात घेता औषधांचा मुबलक प्रमाणात साठा ठेवावा, निवारा केंद्रे, अन्नपुरवठा व बोटी याबाबतही दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

महावितरण विभागाने ग्रामीण व शहरी भागात आपातकालीन परिस्थितीत विज पुरवठा सुरळीत राहील यासाठी नियोजन करावे. नदी लगतच्या तसेच प्रकल्पाच्या आजू बाजूच्या क्षेत्रातील नागरी वस्तींना धोका निर्माण झाल्यास आधीच त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव पथके तयार ठेवावीत. तसेच अधिक पर्जन्यमान अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने अगोदरच पुररेषेबाहेर निवासाची व्यवस्था करावी. जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाणीपातळी व पाण्याचा विसर्ग याबाबत दैनंदिन अहवाल प्रशासनाला कळवावा, अशा सूचनाही श्री. केंद्रेकर यांनी दिल्या.

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी जलसंपदा विभागाच्या वतीन मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here