दिलखुलास कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची मुलाखत

मुंबई, दि. 15 : राज्य शासन जनकल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करणार असल्याची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतांना जिल्ह्यातील कृषी, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करतांना स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, कृषीचा विकास करताना शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देणे तसेच तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून विकास करणे, अशा विविध विषयांवर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 16, बुधवार दि. 17 आणि गुरुवार दि.18 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतली आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं