मुंबई दि.१५: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यासाठी मुलाखती होणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी १७ मे २०२३ रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
नाशिकमधील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. २९ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत एसएसबीचे कोर्स क्र ५३ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दि. १७ मे २०२३ रोजी मुलाखतीस हजार रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी पुणे सैनिक कल्याण विभागाच्या (Department of Sainik Welfare, Pune (DSW) या फेसबुक पेजवर सर्च करून त्यामधील SSB ५३ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्ठांची प्रत भरून सोबत आणावी.
केंद्रातील कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता आवश्यक असून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सोबत आणावेत. त्यानुसार कंम्बाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSC-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. किंवा एनसीसी (C) सर्टिफिकेट अ किंवा ब श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.किंवा टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. किंवा विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
००००
पवन राठोड/स.सं