‘शासन आपल्या दारी’ अभियान प्रभावीपणे राबविणार – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

औरंगाबाद, दि. 16 (विमाका) :- शासकीय योजनांची अमंलबजावणी गतिमान करताना योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थींना मिळवून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. बळीराजा सर्व्हेक्षणाचे काम 31 मे पूर्वी पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात  ‘शासन आपल्या दारी’ तसेच ‘बळीराजा सर्व्हेक्षण’ या दोन्ही उप्रकमाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी घेतला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,मनपाचे उपायुक्त रणजित पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पी.आर.देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी नियोजन करावे. यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून आपल्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करावे व या अभियानांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकाच दिवशी प्रत्यक्ष शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी केले.

प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देण्यासाठी गतीने याबाबतची कार्यवाही करावी. दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल सातत्याने जिल्हा प्रशासनाला सादर करावा. जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना म्हणाले, *‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. यासोबतच बळीराजा सर्व्हेक्षणाच्या कामकाजात गती घ्यावी लागणार आहे. सर्व्हे वेळेत करून शासनास अहवाल सादर करावा लागणार आहे. यामध्ये आपले गाव मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी  अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विधाते यांनी “शासन आपल्या दारी” या अभियानाबद्दल माहिती दिली. थेट लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्वांचे प्रयत्न उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाचे नियोजन सादर केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

000