बुलडाणा, दि. १६ : जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला 370 कोटी रूपयांचा निधी यावर्षी प्राप्त होणार आहे. या निधीमधून जिल्ह्यातील रूग्णांसाठी डायलिसीसची सुविधा प्राधान्याने उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून 9 कोटी रूपयांचा निधी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हा नियोजन व विकास समितीतर्फे येत्या वर्षात करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, श्वोता महाले, कृषि सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून गुणवत्तापूर्ण कामे होण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीमध्ये तीन हजारावर डायलिसीसचे रूग्ण आहेत. या रुग्णांना डायलिसिस साठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या निधीतून सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. गेल्या काळात 140 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात आल्यामुळे रूग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.
यावर्षीच्या निधीमून अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यात उघड्यावर अंगणवाडी भरत असलेल्या ठिकाणीची यादी मागविण्यात येणार आहे. या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच 22 आदर्श शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यातून विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आणि शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. या विकासात्मक कामांना विजेची गरज असल्याने या शाळांना सौरऊर्जेची व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.
पोलिस दलाला नविन चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी रूपये देण्यात येणार आहे. यातून 20 चारचाकी आणि दुचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलिस विभागाला करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन मधून जिल्ह्याच्या विकासासाठी आश्वासित निधी प्राप्त होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.
000