जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

0
6

मुंबई, दि. १६ : माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनतळ अपुरे पडतात. सांगली महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या १७ एकर जागेवर अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारणीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रस्ताव तयार करावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करणे व अनुषंगिक बाबींविषयी परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. या अभ्यास गटाने याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून आपले सरकार या पोर्टलवरही तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालय, वाहतूक पोलीस विभाग किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दूरध्वनी व ईमेलद्वारे तक्रारीची नोंद करता येईल असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या ट्रक टर्मिनस, जकात नाक्याची जागा इत्यादी मागण्यांबाबत पुढील आठवड्यात नगर विकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण व मुंबई महानगरपालिकांच्या  अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

या बैठकीत मालवाहतूक वाहनांची कागदपत्रे तपासणी, वाहन क्षमता तपासणी, बॉर्डर चेक पोस्ट, परिवहन विभागाने मालवाहतूक भाड्याची व्याख्या निश्चित करणे,राष्ट्रीय महामार्गावर विश्रांतीगृह,शौचालय तसेच पार्किंग सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, यांच्यासह विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी, तसेच ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here