पुणे, दि. १७ : पुढील वर्षी स्वच्छ भारत अभियानात पुणे शहराला देशात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येण्यासाठी महानगरपालिकेसह नागरिकांनीही योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा २०२३’ च्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त आशा राऊत, राष्ट्रीय टेनिस खेळाडू तथा पुणे महानरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर ऋतुजा भोसले, माजी नगरसेवक माधुरी सहस्रबुद्धे, कमिन्स इंडिया कंपनीच्या अवंतिका कदम आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, महानगपालिकेने राबविलेली प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची कल्पना अतिशय अभिनव असून पुणे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावण्याबाबत जागतिक पातळीवर संशोधन चालू आहे. स्वच्छतेची सवय म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करावे.
नागरिकांनी आपली सोसायटी, शहर, कार्यालय, कॉलनी, घर स्वच्छ ठेवावे. ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती होते. प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर आहे. प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करुन विविध वस्तू बनविता येतात, तसेच रस्ता बनविण्यासाठीही प्लास्टिकचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे कचरा म्हणून टाकले जाणारे प्लास्टिक संकलन करणे हाही एक चांगला उपक्रम आहे.
कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहनासाठी पुणे शहरात १०० ठिकाणी कापडी पिशव्या मिळण्याचे यंत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक बॉटल संकलन करण्यासाठी कमिन्स इंडिया कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारून चांगले कार्य केल्याचे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शहर पातळीवरील व क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील वैयक्तिक, शैक्षणिक, व संस्थात्मक गटातील प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना प्रतिनिधीक स्वरुपात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात श्री. खेमनार म्हणाले, या अभियानात २३ टन प्लास्टिकचे संकलन करण्यात आले. पुणे शहरात आपण दररोज २ हजार २०० टन कचरा संकलन करत असून त्यापैकी २०० टन कचऱ्याचे रिसायकलिंग केले जाते. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वच्छतेकडून संपन्नतेकडे’पुस्तिकेचे, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, ‘हवेची गुणवत्ता आणि पुणे’ या शिक्षण हस्तपुस्तिकेचे आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) झेंड्यांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी पुणे शहरात स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्या विविध संस्था, पुनर्प्रकियेद्वारे उत्पादने बनवणाऱ्या, माझा कचरा माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी झालेल्या, कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या संस्था, कमिन्स इंडिया, जनवाणी संस्था, कारागिरी संस्था व सरहद्द कॉलेज आदींनाही पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
पुणे शहरातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन
पुणे शहरातील १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर वैयक्तिक, सर्व वयोगटातील नागरिक, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, संस्थात्मक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था व गणेश मंडळे इत्यादी गटांमध्ये १ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीमध्ये प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेअंतर्गत एकूण २३ टन वजनाच्या प्लास्टिक बॉटल्स संकलित करण्यात आल्या असून या प्लास्टिक बॉटल्सचा पुर्नवापर करणे आवश्यक आहे. या पासून पर्यावरणाचा संदेश देणे करीता सार्वजनिक ठिकाणी शिल्प उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टीकचा वापर रस्ते विकासना करिता करण्यात येणार आहे. या शिवाय १६ टन प्लास्टिक पासून नाविन्यपूर्ण पद्धतीने टी शर्ट तयार करण्यात येत आहेत.
‘मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर’ हे राष्ट्रीय अभियान १५ मे ते ५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सहभागातून विकेंद्रित पद्धतीने थ्री आर- रिड्यूस-रियुज- रिसायकल सेंटर्स उभारली जाणार असून या अभियानाचे उद्दिष्ट लाईफ मिशनच्या पर्यावरण रक्षण व संवर्धन उद्दिष्टाशी संलग्नित आहे.