मुंबई, दि. 23 : राज्यात एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल ॲण्ड प्लॅनेट (GEAPP) मध्ये हेतू करार (Memorandum of Intent) करण्यात आला.
याप्रसंगी ‘महाप्रीत’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, GEAPP चे अध्यक्ष रवी व्यंकटेशन, उपाध्यक्ष सौरभकुमार, ‘महाप्रीत’ कंपनीचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटील, संचालक (तांत्रिक) रवींद्र चव्हाण व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी ‘महाप्रीत’चे मुख्य महाव्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी या प्रकल्पाबाबतची माहिती सादर केली. राज्य शासनाने राज्यात दोन लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. या हेतू कराराअंतर्गत GEAPP आणि महाप्रीत कंपनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ५०० मेगावॅट क्षमतेचे रुफटॉप सोलर प्रकल्प आणि कुसुम (KUSUM) योजनेअंतर्गत ५०० मेगावॅट क्षमतेचे ग्राऊंड-माऊंटेड विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मदत करतील. तसेच लघु आणि मध्यम उद्योग क्लस्टर्ससाठी सौर ऊर्जाप्रकल्पाची क्षमता २.५ गिगावॅटपर्यंत वाढविण्याचा मानस आहे. या प्रकल्पांचे व्यवस्थापन, रचना, विकास आणि गुंतवणूक करण्यासाठी ‘महाप्रीत’ला या हेतू कराराद्वारे GEAPP सहकार्य करेल.
यावेळी श्री. श्रीमाळी म्हणाले, “राज्यभरात एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी GEAPP ‘महाप्रीत’ला सहाय्य करत असल्यामुळे राज्यातील संबंधित घटकांना याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र राज्यात हरित गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगिण शाश्वत व निरंतर विकासासाठी मदत होईल”.
या उपक्रमाबाबत GEAPP चे अध्यक्ष श्री. व्यंकटेशन म्हणाले की, ‘GEAPP’ अक्षय ऊर्जेच्या दिशेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि कार्बन फुट प्रिंट कमी करण्यासाठी कार्यरत आहे. हा हेतू करार म्हणजे त्या दिशेने जाणारे एक पहिले पाऊल आहे. महाराष्ट्रातील लोकांपर्यंत स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामुळे राज्यात २२ गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टाला चालना मिळेल. ‘महाप्रीत’ आणि GEAPP या दोन्हींच्या एकत्रित कौशल्यामुळे आम्ही एक हजार मेगावॅटचे सौर प्रकल्प यशस्वीपणे राबवू आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देऊ. या सहकार्यामुळे सर्व भागधारकांसाठी एक शाश्वत व्यवसाय मॉडेल तयार करण्यात मदत होईल आणि प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘महाप्रीत’ला संस्थात्मक सहाय्य मिळेल’’.
याप्रसंगी GEAPP चे उपाध्यक्ष सौरभकुमार म्हणाले की, “‘महाप्रीत’ कंपनीसोबत आमची भागीदारी महाराष्ट्रात शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेद्वारे कार्बन फुट प्रिंट कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. या सहयोगाद्वारे आम्ही SMEs आणि ग्रामीण समुदायांना स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे”.
****
संध्या गरवारे/विसंअ/