नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून त्यांना सुविधा द्यावी – कामगार मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि. 24 : राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहीम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. खाडे बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, कामगार आयुक्त श्री. देशमुख, बाष्पके संचालक श्री. अंतापूरकर आदी उपस्थित होते.

राज्य कामगार विमा योजनेंतर्गत कामगार रूग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. खाडे म्हणाले, ईएसआय रूग्णालयांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एमआयडीसी परिसरात जागा मिळवून द्यावी. तसेच कामगार भवनसाठीसुद्धा जागेची उपलब्धता करावी. जागेसाठी संबंधित जिल्हाधिकारी व एमआयडीसी अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करावा. कामगार भवन व रूग्णालय इमारतीचे डिझाईन तयार करावे. जेथे जागा उपलब्ध झाली, तेथे जागा ताब्यात घेऊन अंदाजपत्रके तयार करावी. कामगारांच्या सुविधांसाठी कामगार भवन उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे बॉयलर प्रशिक्षण केंद्राची स्थापना एमआयडीसी परीसरात करावयाची आहे. त्यासाठी जागेची निश्चिती करावी.

मंत्री श्री. खाडे पुढे म्हणाले, ई श्रम पोर्टलवर नोंदणी वाढवावी. त्यासाठी मोठ्या ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घ्यावी. विटभट्टी, रोहयो कामगार आदींची प्राधान्याने नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या कामगारांना कार्डचे वितरण पूर्ण करावे. कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी नोंदणी केलेले कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे ही कारवाई पूर्ण करावी. नाका कामगारांना बसण्यासाठी विभागाच्यावतीने नाका शेड उभारण्यात येणार आहे. यामध्ये बसण्याची, पाण्याची व्यवस्था असणार आहे. नाका कामगारांना नोंदणी करून पासबुक द्यावे. या पासबुकमध्ये 90 दिवस कामाच्या नोंदणीची व्यवस्था असावी. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना मंत्री श्री. खाडे यांनी दिल्या. बैठकीला प्रधान सचिव श्रीमती सिंगल यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/ससं/