मुंबई, दि. 26 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी डॉ. मोहसीन युसुफ शेख यांना राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या क्यूआर कोडचा वापर बद्दल श्री. शेख यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
महसूल विभागामार्फत विविध अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय दिले जातात. हे आदेश या विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतात. मात्र, या संकेतस्थळावरील निकालपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे सर्व बाबींवर मात करण्यासाठी राहाता मंडळ अधिकारी कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरणासाठी ‘क्यूआर कोड’ (QR code) ही संकल्पना राबविण्यात आली. या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी डॉ. शेख यांना राजीव गांधी प्रशासकीय अभियान 2022-2023 शासकीय कर्मचारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. अशाच प्रकारची कल्पकता व नाविन्यता डॉ. शेख यांनी महसूल विभागात प्रथमच राबविण्यास सुरूवात केली. ही नाविन्यपूर्ण संकल्पना कशा प्रकारे राबविण्यात आली याबाबतची सविस्तर माहिती, ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. शेख यांनी दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शनिवार दि. 27 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आहे.