महाराष्ट्र विधिमंडळाच्या सदस्यांनी ‘एमआयटी’ आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याचे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापतींचे आवाहन

मुंबई, दि २६ : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे या संस्थेतर्फे दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान “राष्ट्रीय विधिमंडळ सदस्य (विधायक) संमेलना”चे (1st NATIONAL LEGISLATORS’ CONFERENCE) – २०२३ आयोजन करण्यात आले असून या उपक्रमामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या अधिकाधिक सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. आज यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि उप सभापती मा.डॉ. नीलम गोऱ्हे “एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे”चे संस्थापक आणि या उपक्रमाचे आयोजक श्री. राहुल कराड यांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे पत्रकार परिषद (ऑनलाईन) आयोजित करण्यात आली. यावेळी दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान या परिषदेत आयोजित करण्यात आलेले विविध विषयांवरील सत्र तसेच उद्घाटन सोहळ्याला लाभणारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती याबाबत राहुल कराड यांनी माहिती दिली.

“जीओ कन्व्हेंशन सेंटर – बीकेसी, मुंबई” येथे ही तीन दिवसीय परिषद “एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे” तर्फे आयोजित करण्यात आली असून देशातील सर्व राज्य विधानमंडळांच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तसेच जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या विधिमंडळाचे कामकाज आणखी प्रभावी होणे, लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न आणखी सुयोग्यरित्या सभागृहात मांडता यावेत यादृष्टीने प्रबोधन, विकासोन्मुख धोरणनिश्चितीमध्ये सर्वांचा सहभाग आणि सर्वांचा विकास, यादृष्टीने या परिषदेतील विचारमंथन यापुढील काळात सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा विश्वास या पत्रकार परिषदेत बोलतांना विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती  डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन,  डॉ. मीरा कुमारी, अध्यक्ष  श्री. शिवराज पाटील-चाकुरकर, श्री. मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन देखील या तीन दिवसीय परिषदेत लाभणार आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी-मार्च, २०२३ मध्ये दोन्ही सभागृहात पीठासीन अधिकारी यांनी यासंदर्भातील घोषणादेखील केली आहे. या पत्रकार परिषदेत (ऑनलाईन) विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,  कपिल पाटील, वि.प.स., विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार)  जितेंद्र भोळे, सचिव- २ (कार्यभार) डॉ. विलास आठवले, मा. उप सभापती यांचे खाजगी सचिव  रविंद्र खेबुडकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक  निलेश मदाने, एमआयटीचे अण्णासाहेब टेकाळे आणि पत्रकार सहभागी झाले. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरात परिषदेतील विविध सत्रांचे विषय आठ दिवस अगोदर सर्वांना उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले.