स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार नवतंत्रज्ञानाचा वापर करीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 27 – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे आत्मभान, आत्मतेज आणि आत्मविश्वास जागविणारे आहेत. त्यांचे हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असून यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या कादंबरीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामनगर येथील श्री शक्तिपीठ येथे करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे.  यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॅा. वि.स.जोग होते. तर कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी यांनी यावेळी प्रकाशित कादंबरी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले.

मृत्युंजयाचा आत्मयज्ञ ही कादंबरी अनेक कागदपत्रांचा अभ्यास आणि मोठ्या प्रमाणावर संशोधनाअंती तयार करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आजवर अनेक लेखकांनी लेखन केले आहे.  मात्र, कादंबरीच्या स्वरूपात हे वेगळ्या प्रकारचे लेखन आहे. सावरकरांच्या जीवनचरित्रावर सर्वांगाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे पुस्तक रुपात उपलब्ध आहेत. बदलता काळ लक्षात घेता नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. पुस्तकांसंदर्भात सध्या ऑडिओ बुक हे माध्यम सध्या प्रचलित आहे. या माध्यमाचा वापर ही कादंबरी आणि सावरकरांचे विचार पुढच्या पीढीपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन इंडिया बुक ऑफ रेकॅार्ड पुरस्काराने सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. यापूर्वी ही कादंबरी ‘जयोस्तुते’ या नावाने हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आली आहे.

 

000000