स्काऊट्स आणि गाइड्सचे कामकाज जुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा- मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स या संस्थेची नव्याने तयार करण्यात आलेली नियमावली मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आली आणि त्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ही नियमावली भारत स्काऊट्स आणि गाइड्स राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आली आहे.

आमदार श्री. बावनकुळे यांच्या शिष्टमंडळाने जुन्या नियमावलीनुसार कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली असल्याने त्याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील स्काऊट्स आणि गाइड्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

0000

राजू धोत्रे/विसंअ/